जम्मू-काश्मीरमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश

भारतविरोधी कारवायांप्रकरणी 8000 खाती गोठविली

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी वेगाने फैलावणाऱ्या ‘म्यूल अकौंट’ नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. या बँक खात्यांद्वारे पाठविण्यात आलेला पैसा फुटिरवादी किंवा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात आला असावा असा संशय तपास यंत्रणांना आहे. मागील 3 वर्षांमध्ये पूर्ण क्षेत्रात अशाप्रकारच्या 8 हजारांहून अधिक खात्यांची ओळख पटवत त्यांना गोठविण्यात आले आहे. यामुळे मनी लॉन्ड्रिंगच्या एका जटील नेटवर्कचा खुलासा झाला आहे.

तपास यंत्रणेनुसार म्यूल अकैंट सायबर गुन्ह्याच्या साखळीचा सर्वात कमकुवत परंतु अत्यत महत्त्वाचा हिस्सा असतो. म्यूल अकौंटशिवाय गुन्हेगारांना चोरीचा पैसा क्रिप्टोकरन्सी यासारख्या डिजिटल संपत्तींमध्ये रुपांतरित करणे अवघड असते. वाढता धोका पाहता केंद्रीय तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीर पोलीस आणि अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांना बँकांसोबत मिळून अशा प्रकारच्या खात्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘म्यूलर’चा शोध

तपास यंत्रणा आता अशा मध्यस्थांचा शोध घेत आहेत, ज्यांना ‘म्यूलर’ म्हटले जाते. हे लोक वित्तीय फसवणुकीच्या या साखळीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. 2017 मध्ये एनआयएने क्षेत्रात अवैध फंडिंगविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यावर देशविरोधी नेटवर्कने स्वत:च्या पद्धती बदलल्या. पारंपरिक पद्धतींच्या जागी आता कथित स्वरुपात ‘डिजिटल हवाला’ प्रणाली गुन्हेगारांनी अवलंबिली आहे.

डिजिटल हवालाची नवी पद्धत

या नव्या मॉडेलमध्ये म्यूल अकौंटधारक आणि म्यूलरांना मिळणारे कमिशन राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक कृत्यांमध्ये वापरले जाऊ शकते. म्यूलर थेट फसवणूक होणाऱ्या लोकांशी संपर्क साधत नाही. परंतु फसवणुकीतून प्राप्त रक्कम जमा अन् हस्तांतरित करण्यासाठी बँक खात्यांची व्यवस्था करत असतो. यातील अनेक खाती सर्वसामान्य लोकांच्या नावावर असतात. लोकांना कमाईचे प्रलोभत दाखविले जाते आणि जोखीम अत्यंत कमी असल्याचा भरवसा दिला जातो. लोकांकडून ऑनलाइन बँकिंग समवेत खात्याची पूर्ण माहिती मिळवत हे खाते अस्थायी स्वरुपात ‘पार्किंग अकौंट’प्रमाणे वापरले जाणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात याच खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून प्राप्त रक्कम फिरविली जाते.

एकाचवेळी अनेक खात्यांचा वापर

एक गुन्हेगार एकाचवेळी 10-30 म्यूल खात्यांचा वापर करू शकतो असे तपासात समोर आले. अनेक प्रकरणांमध्ये बनावट कंपन्यांच्या नावांवर खाती उघडली जातात. ज्यात एका दिवसात 40 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार होतात. रकमेला अनेक खात्यांमध्ये जलदपणे फिरविले जाते आणि छोट्या छोट्या हप्त्यांमध्ये विभागून पाठवत देखरेख व्यवस्थेपासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो.

खातेधारकही जबाबदार

म्यूल अकौंटधारक थेट फसवणूक करत नसला तरीही त्याला मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील असल्याचे मानले जाईल असे सुरक्षा अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. कमिशन घेत स्वत:चे खाते सोपविल्याने गुन्हेगारी नेटवर्क मजबूत होते. पूर्ण फसवणूक याच खात्यांवर निर्भर असते. पैसे पोहोचविण्याचे माध्यमच नसेल तर फसवणूक करणे शक्य नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

Comments are closed.