कबुतराने दागिन्यांच्या दुकानातून सोनसाखळी चोरली
गळ्यात घालून फिरत राहिला
सोशल मीडियावर एक कबूतर व्हायरल होत असून लोक त्याची छायाचित्रे शेअर करत आहेत. कबूतराने एका ज्वेलरी शॉपमधून सोन्याची चेन पळविली. याचबरोबर कबूतराने या सोन्याच्या साखळीला स्वत:च्या गळ्यात घातली आणि यानंतर तो या सोन्याच्या चेनसह फिरत राहिला. आता या कबूतराचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना राजस्थानच्या नागौर येथे घडली आहे. आता कबुतरांनाही सोन्याची आवड निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर युजर व्यक्त करत आहेत. याचबरोबर काही कबुतरांनी स्वत:च्या रिटायरमेंटचे प्लॅनिंग केल्याचे म्हणत आहेत. या कबुतराची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत.
नागौरच्या डेगानामध्ये एका ज्वेलरी शॉपच्या वर निर्मित खोलीत कारागिर सोन्याची साखळी तयार करत असताना तेथे एक कबूतर शिरले आणि सोन्याची साखळी चोचेत पकडून पसार झाले. यानंतर कबूतर नजीकच्या घरावर जाऊन बसले आणि सोन्याची चेन त्याने स्वत:च्या गळ्यात घालून घेतली. या घटनेनंतर बाजारात लोकांची गर्दी झाली आणि कबूतरापासून सोन्याची साखळी मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
लोकांच्या या प्रयत्नांना यश मिळाले की नाही हे समोर आलेले नाही. परंतु कबुतराने लोकांना स्वत:च्या या कृत्याद्वारे चकित केले हे मात्र निश्चित. सोन्याची साखळी कबुतराने उचलून नेणे फारसे नवलाचे नसले तरीही पक्ष्याने सोन्याची साखळी स्वत:च्या गळ्यात घालून घेणे मात्र लोकांना चकित करणारे होते.
Comments are closed.