जेफ्री एपस्टीनची आत्महत्या नव्हे, हत्या झाली! पोस्टमॉर्टमवेळी निरीक्षक असलेल्या फॉरेन्सिक तज्ञाचा दावा
अमेरिकेतील सर्वात मोठय़ा सेक्स स्पँडलचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूबद्दल नवी माहिती समोर आली आहे. ‘एपस्टीनचा तुरुंगात झालेला मृत्यू ही आत्महत्या नव्हती तर हत्या होती. त्याचा मृत्यू गळफास लागल्यामुळे नव्हे तर गळा दाबल्यामुळे झाला होता,’ असा दावा पोस्टमॉर्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका फॉरेन्सिक तज्ञाने केला आहे.
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व मानवी तस्करी प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीन याची लाखो कागदपत्रे, ई-मेल्स, फोटो आणि व्हिडीओ अमेरिका सरकार खुले करत आहे. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अनेक देशांतील सत्ता सिंहासने हादरली आहेत. अशातच एपस्टीनची हत्या झाल्याचा दावा फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट डॉ. मिशेल बॅडेन यांनी ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
बेंडेन यांनी स्वतः एपस्टीनचे शवविच्छेदन केले नव्हते. ते निरीक्षक म्हणून तिथे उपस्थित होते. ‘एपस्टीनच्या मानेवर तीन खुणा आढळल्या होत्या. दोन पुढच्या बाजूला आणि एक मागील बाजूस होती. शिवाय, मानेला तीन ठिकाणी फॅक्चर झाले होते. फाशीच्या प्रकरणात असे फ्रैक्चर मी कधीही पाहिले नव्हते. त्याला गळा दाबून मारण्यात आल्याचे दिसते. सत्य बाहेर येण्यासाठी पुढील तपास आवश्यक आहे,’ असे बेंडेन म्हणाले.
अमेरिका सरकारच्या अहवालात काय?
यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या २०२३ च्या अहवालातही अनेक संशयास्पद मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. न्यूयॉर्क तुरुंगांमधील सुरक्षाव्यवस्था पुरेशी नव्हती. एपस्टीनच्या सेलमध्ये अनेक ब्लॅकेट, चादरी आणि कपडे होते. त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्यासोबत तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये हलवण्यात आले. एपस्टीनची दैनंदिन आरोग्य तपासणी रात्री आठ वाजता होत असे, पण मृत्यूच्या आदल्या दिवशी पावणेअकरा वाजेपर्यंत ही तपासणी झालीच नाही. खोटे तपासणी अहवाल सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षकांनी एपस्टीन मृत असल्याचे नोंदवले. त्याच्या गळ्यात कापडी फास होता. रक्षकांनी फास काढून टाकला आणि सीपीआरचा प्रयत्न केला आणि नंतर त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या नोंदीमुळे त्याच्या मृत्यूबद्दल संशय वाढला आहे.
Comments are closed.