संरक्षक भिंत नाही, मोकाट गुरांचा ठिय्या, पालीतील मढाळी रस्ता कचऱ्याने गिळला, दुर्गंधीने नागरिक हैराण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाली शहरातील दररोज उचलला जाणारा हजारो टन कचरा टेंबी येथील डम्पिंगवर न टाकता मढाळी रस्त्यालगत टाकला जातो. त्यामुळे हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरला आहे. ग्रामस्थांना कचऱ्यातून वाट काढताना मनस्ताप सहन करावा लागतो. डम्पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत नसल्याने दररोज मोकाट गुरांचा ठिय्या असतो. रस्त्यालगतच कचऱ्याचे ढीग साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत घेण्याची वेळ आली आहे.

पालीतील मढाळी रस्त्यालगत सुमारे दोन एकर जमिनीवर टेंबी डम्पिंग ग्राऊंड आहे. शेजारीच मढाळी गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तसेच जवळच शिक्षक वसाहतही आहे. या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे अक्षरशः डोंगर उभे राहिले आहेत. शहरातून उचलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. मात्र संरक्षण भिंत नसल्यामुळे हा संपूर्ण कचरा रस्त्याच्या कडेला आला आहे. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डम्पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत घालून या समस्येवर प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढवा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डम्पिंग ग्राऊंड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कंपोस्ट पिट्स आणि एम.आर.एफ. शेडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. खड्ड्यांचे काम पूर्ण होताच ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. एम.आर.एफ. शेडमध्ये सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल.
माधुरी मडके, मुख्याधिकारी, नगरपंचायत, पाली

Comments are closed.