मालेगाव उपमहापौरांच्या दालनात पुन्हा लागणार टिपू सुलतानाचा फोटो; शान-ए-हिंद यांच्या वक्तव्यामुळ

टिपू सुलतान वाद: मालेगाव महानगरपालिकेतील (Malegaon Municipal Corporation) वादग्रस्त छायाचित्र प्रकरणावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद (Shan-e-Hind Nihal Ahmad) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी एका स्वागत समारंभात केले. या वक्तव्यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कार्यक्रमात बोलताना उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचे उघडपणे कौतुक केले. “इंग्रजांविरोधात लढणाऱ्या योद्ध्याचा फोटो लावण्यात गैर काय?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. देशभरात टिपू सुलतान यांच्या संदर्भात सुरू असलेला वाद अद्याप शांत झालेला नसतानाच उपमहापौरांचे हे दुसरे विधान समोर आल्याने शहरातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

Tipu Sultan Controversy: पदभार घेताच वादाला तोंड

मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला.

Tipu Sultan Controversy: सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

उपमहापौरांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

Tipu Sultan Controversy: राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता

या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाला होता. शिवसेनेचे नगरसेवक थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते. “उपमहापौरांच्या दालनातील फोटो तत्काळ हटवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा देत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी संघटनांनीही या कृतीचा निषेध करत उपमहापौरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना आणि काही नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रशासनाने टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवला होता. वाढता तणाव आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता नगरसचिवांनी हस्तक्षेप करत “वाद टाळण्यासाठी” संबंधित फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता  उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो दालनात पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य केल्याने राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Saamana Agralekh : भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपू सुलतानाचा गौरव केलाय, आता भाजप त्याच कबरीत पडलाय; ‘सामना’च्या अग्रलेखातून आगपाखड

आणखी वाचा

Comments are closed.