अपयशाच्या राखेतून फिनिक्सभरारी… Rise – Fall – Comeback , कहाणी ईशान किशनची!


कोलंबोचं खचाखच भरलेलं आर. प्रेमदासा स्टेडियम. भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्तानं दोन्ही देशांच्या चाहत्यांसह स्थानिक श्रीलंकन चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये गर्दी केली होती. हा सामना या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला सर्वात चर्चेतला आणि तितकाच वादाची किनार लाभलेला सामना. पण याआधीच्या इतर सामन्यांप्रमाणे भारतानं हाही सामना सहज जिंकला आणि पाकिस्तानविरुद्धच्या या द्वंद्वात आपणच ‘बाप’ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.

टीम इंडियाच्या या धमाकेदार विजयाचा खरा हीरो ठरला तो 40 चेंडूत 77 धावांची जबरदस्त खेळी करणारा ईशान किशन. ईशाननं आपल्या या खेळीनं भारताला केवळ मोठं आव्हान उभं करून दिलं नाही तर संघाच्या यशाचा पाया रचला. पुढे जाऊन बुमरा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला गुंडाळलं आणि कोलंबोत विजयाचा कळस उभारला.

स्टार खेळाडू ते फ्लॉप क्रिकेटर

गेल्या काही काळात ईशान किशनच्या आयुष्यात, त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत बरेच असे चढउतार आले की त्यामुळे तो सर्वात गुणवान खेळाडू ते फ्लॉप क्रिकेटर ठरला. Rise-Fall-Comeback असे टप्पे प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यात येतातच. त्यातून तो कसा मार्ग काढतो यावरच त्याचं क्रिकेटविश्वातलं भवितव्य ठरतं. ईशान किशनच्या बाबतीतही तेच घडलं. ईशाननं घेतलेले काही निर्णय, त्यानं केलेली मेहनत आणि कामगिरीत दाखवलेलं सातत्य यामुळे आज त्या अपयशावर मात करून पुन्हा टीम इंडियाचा स्टार फलंदाज बनलाय.

आयपीएल ते टीम इंडिया…

2016 साली झारखंडचा 19 वर्षांचा हा मुलगा आयपीएलमध्ये आला. गुजरात लायन्स संघानं लायन्स संघानं त्याला संघात विकत घेतलं. पहिल्या वर्षी अवघे 5 सामने वाट्याला आले. पुढच्या सीझनमध्ये 11 सामने आणि 274 धावा ही कामगिरी आयपीएलमध्ये स्वत:चा एक ठसा उमटवण्यास ईशानला पुरेशी ठरली. 2018 मध्ये ईशानच्या क्रिकेटिंग करियरला कलाटणी मिळाली ती त्यावर्षीच्या सीझनआधीच्या ऑक्शननंतर. आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सनं ईशानवर बोली लावून त्याला विकत घेतलं. आणि इथून पुढे झाला एक मोठा प्रवास.

मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळानंतर ईशानच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. 2020 मध्ये मुंबई इंडियन्सनं आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. त्या संपूर्ण स्पर्धेत ईशानच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. ईशाननं शानदार खेळी करत 14 सामन्या 546 धावाही कुटल्या. पुढे जाऊन ईशानला त्याचं फळ मिळालं. आणि 2021 मध्ये ईशानला भारतीय वन डे आणि टी20 संघातही स्थान मिळालं.

स्वप्नवत प्रवास आणि भली मोठी झेप

2021 हे वर्ष ईशानसाठी भाग्यदायी ठरलं. वन डे आणि टी20 सामन्यात त्यानं भारताकडून पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी एका वन डे सामन्यात त्यानं चक्क द्विशतक झळकावलं. त्यामुळे 2023 च्या वन डे विश्वचषकासाठी त्याच्या नावाची मोठी चर्चाही झाली.

फॉर्म ढासळला, संघाबाहेर गेला

पण त्यानंतरच्या काळात ईशानचा फॉर्म हरवला. बॅटमधून धावांचा ओघ आटला. ईशान हळूहळू टी20 आणि वन डे संघाबाहेर गेला. हे सगळं एका वर्षात घडलं. ईशानच्या मागून येऊन शुभमननं वन डे संघात आपलं स्थान पक्कं केलं. तो विश्वचषकही खेळला. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी ईशानला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही वगळण्यात आलं. लोकेश राहुल, रिषभ पंतमुळे ईशानला संघात पुन्हा स्थान मिळवणं कठीण बनलं. यावेळी त्यानं एक मोठा निर्णय घेतला, क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा.

ईशानची फिनिक्सभरारी

2025-26 चा डोमेस्टिक सीझन… ईशान झारखंडकडून मैदानात उतरला. रणजी करंडकात 173 धावांची दमदार खेळी साकारली. विजय हजारे करंडकात अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकून इतिहास घडवला. मग मुश्ताक अली टी20 स्पर्धेत त्यानं झारखंडचं नेतृत्व केलं. यावेळी ईशानच्या नेतृत्वात झारखंडनं पहिल्यांदा मुश्ताक अली करंडकावर नाव कोरलं. झारखंडच्या या यशात सर्वात मोठा वाटा होता तो ईशान किशनचा. त्यानं या स्पर्धेत 10 सामन्यात सर्वाधिक 517 धावा केल्या. यात हरियाणाविरुद्ध अंतिम सामन्यातली शतकी खेळी निर्णायक ठरली.

थेट विश्वचषक संघात एन्ट्री

ईशाननं आपल्या जबरदस्त कामगिरीनं आणि कुशल नेतृत्वानं झारखंडला जिंकून दिलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत विश्वचषकासाठीचा संघ निवडला जाणार होता. ईशानची कामगिरी पाहता त्याचं संघातलं स्थान निश्चित मानलं जात होतं. पण कुणाच्या जागी ईशानला संधी देणार? बीसीसीआयनं अखेर तो कठोर निर्णय घेतला. चक्क वन डे आणि टी20चा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला बाजूला सारून बीसीसीआयनं ईशान किशनला संघात जागा करुन दिली. बीसीसीआयचा हा निर्णय ईशाननं सार्थ ठरवला.

आगामी सामन्यांमध्ये खासकरुन सुपर 8 च्या लढतींमध्ये टीम इंडियाला ईशानकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. गतविजेत्यांना आपल्याच देशात पुन्हा एकदा टी20 विश्वचषक उंचावण्याची संधी आहे. संपूर्ण स्पर्धेत ईशानचा हाच फॉर्म कायम राहिला तर 8 मार्चला पुन्हा एकदा इतिहास घडेल…

Comments are closed.