स्थानिक स्पर्धांमध्ये देवदत्त पड्डीकलचा धावांचा पाऊस सुरूच! आता केले द्विशतक, कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी कामगिरी

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना लखनऊमध्ये खेळला जात आहे.यामध्ये उत्तराखंड विरुद्ध कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकलने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने २८८ चेंडूतच २०० धावा पूर्ण केल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीने कर्नाटकची सामन्यातील स्थिती मजबूत झाली आहे. त्याने या हंगामाच्या स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे, यावरून तो किती भन्नाट फॉर्ममध्ये आहे हे दिसून येते.

पड्डीकल उत्तराखंडविरुद्ध ३३० चेंडूत २३२ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने २९ चौकार आणि ३ षटकार मारले. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आहे. त्याचबरोबर त्याचे हे पहिले द्विशतक ठरले आहे. त्याची आधीची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी १९३ धावा होती.

या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी पड्डीकलचा फॉर्म गेला होता. त्यामुळे कर्नाटकचे नेतृत्व मंयक अग्रवालने केले होते. आता त्याने नेतृत्व पदावर परतत ही द्विशतकी खेळी केली असल्याने त्याचे महत्व अधिक आहे.

पड्डीकलने रणजी ट्रॉफी बरोबर २०२५-२६च्या हंगामातील अनेक स्थानिक स्पर्धेत शतकी खेळी केल्या आहेत. त्यामध्ये विजय हजारे ट्रॉफीमधील ४ शतके आणि सईद मुश्ताक अलीमधील एक शतक यांचा समावेश आहे. आयपीएल २०२६आधी त्याचा हा फॉर्म रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (आरसीबी) आनंदाची बातमी आहे.

या सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आजचा (सोमवार, १६ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी कर्नाटककडून केएल राहुलने शतकी खेळी केली होती. त्याने २११ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १४१ धावा केल्या. करुण नायरने ६० धावा केल्या. त्यामुळे कर्नाटकने पहिल्या डावात ५०० धावसंख्येचा आकडा पार केला आहे.

Comments are closed.