मुंबई महापालिकेत सभागृहाच्या शिस्तीचे ‘बारा’ वाजले; महापौर रितू तावडे उशिरा पोहोचल्याने विरोधक आक्रमक, हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दुपारी अडीच वाजता सुरू होणारे कामकाज महापौरांच्या प्रतीक्षेत रेंगाळल्याने विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. महापौर रितू तावडे सभेला वेळेत उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरच शिस्त पाळणार नसतील तर सभागृहाला आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना शिस्त कशी लागणार? असा जळजळीत सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
आजच्या कामकाजात सभागृह नेता, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होणार होती. नियमानुसार, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी कामकाजाला सुरुवात होणे अपेक्षित होते. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आपापल्या बाकांवर येऊन बसले होते, मात्र मुख्य खुर्ची म्हणजेच महापौरच सभागृहात उपस्थित नव्हत्या. महापौर वेळेत न आल्याने विरोधी बाकांवरील नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर सभागृहाचे प्रमुखच वेळेचे भान राखणार नसतील, तर नगरसेवकांना शिस्त कशी लागणार? असा जळजळीत सवाल विरोधकांनी विचारला.
महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सभेत सत्ताधाऱ्यांनी सभागृह वेळेत सुरू होईल असे आश्वासन दिले होते, मग आज हा नियम पायदळी तुडवला गेला. महत्त्वाच्या समित्यांच्या निवडीचा दिवस असताना महापौरांचे उशिरा येणे योग्य नसल्याचा सूर विरोधकांनी आवळला. महापौरांच्या अशा वागण्यामुळे सभागृहाची शिस्त बिघडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान, अडीच वाजून गेल्यानंतरही महापौर न आल्याने विरोधकांनी आपापल्या जागेवर उभे राहत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सत्ताधारी नगरसेवकही उभे राहिल्याने मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. अखेर 10 ते 15 मिनिटे उशिराने महापौर रितू तावडे हजर झाल्या आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली.
Comments are closed.