मॉर्गन आणि बटलरचा रेकॉर्ड मोडला! इंग्लंडसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विल जॅक्सने रचला नवा इतिहास

इंग्लंडचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सने (Will jacks) इतिहास रचला आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार इयोन मॉर्गन आणि जोस बटलर यांना मागे टाकले आहे. मॉर्गन (2012) आणि बटलर (2021) यांनी प्रत्येकी 25 चेंडूत अर्धशतके केली होती, परंतु जॅक्सने आज (16 फेब्रुवारी 2026) इटलीविरुद्ध अवघ्या 21 चेंडूत पन्नास धावा पूर्ण करून हा विक्रम आपल्या नावावर केला.

इटलीविरुद्धच्या सामन्यात विल जॅक्स सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. फलंदाजीमध्ये त्याने 22 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजीत तो फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने 2 षटकात 34 धावा देऊन एक विकेट (बेन मनेंटी) घेतली, जी बरीच महागडी ठरली.

कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये विल जॅक्सने सर्वाधिक 53* धावा केल्या, तर टॉम बँटनने 30 आणि फिल सॉल्टने 28 धावांचे योगदान दिले. 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इटलीचा संघ 20 ओव्हरमध्ये 178 धावांवर गारद झाला. इटलीकडून बेंजामिन मनेंटीने 25 चेंडूत 60 धावांची झुंजार खेळी केली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. अशा प्रकारे इंग्लंडने हा सामना 24 धावांनी जिंकत सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे.

Comments are closed.