सत्ताधाऱ्यांना नागरी भान येण्यासाठी काउन्सिलिंगची गरज; मुंबईतील होर्डिंग्सवरून आदित्य ठाकरेंची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्स आणि होर्डिंग्सवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “कोणतेही सुज्ञ आणि प्रगत सरकार जागतिक दर्जाच्या शहराचे अशा प्रकारे विद्रुपीकरण करत नाही. सरकारमधील लोकांना नागरी भान (Civic Sense) आणि शहराचे सौंदर्य जपण्यासाठी आता खरोखरच काउन्सिलिंगची गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

परदेशी नेत्यांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण मुंबईत, विशेषतः दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “सरकारमधील लोकांना सौंदर्याची जपणूक करण्यासाठी आणि नागरी भान येण्यासाठी गंभीर समुपदेशनाची गरज आहे. परदेशी पाहुणे पहिल्यांदाच येत असल्यासारखा हा अतिउत्साह अनाकलनीय आहे.”

आदित्य ठाकरे यांनी विशेषतः कोस्टल रोडचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “या मूर्खपणाच्या वागण्यातून कोस्टल रोडलाही सोडलेले नाही. मुख्यमंत्री स्वतः जगभर फिरले आहेत, त्यांनी तरी किमान अशा प्रकारे शहराचे स्वरूप बिघडवू नका, अशा सूचना द्यायला हव्या होत्या.”

“पाहुण्यांसाठी रेड कार्पेट अंथरा, त्यांना सर्वोत्तम सेवा द्या, पण हे सर्व करताना शहराचे सौंदर्य नष्ट करू नका,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. मुंबईतील या होर्डिंग संस्कृतीमुळे जागतिक स्तरावर शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचेहे ते म्हणाले.

Comments are closed.