कडक डोपिंगविरोधी मोहीम: हरी रंजन राव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खेळांमध्ये डोपिंगशी संबंधित उद्भवलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय अनुपालन मंचाच्या बैठकीत दूषित पौष्टिक पूरक आहार, प्रिक्रिप्शन औषधांचा गैरवापर आणि प्रतिबंधित पदार्थांची ऑनलाइन विक्री हे चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
क्रीडा सचिव हरि रंजन राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि विविध भागधारकांनी राबवलेल्या डोपिंग विरोधी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि डोपिंग रोखण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समन्वय मजबूत करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. अनवधानाने डोपिंगचे धोके कमी करण्यासाठी आणि स्वच्छ खेळाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पुरवठा साखळी देखरेख मजबूत करण्याची आणि जागरूकता वाढविण्याच्या गरजेवर राव यांनी भर दिला. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसआय) च्या समन्वयाने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांद्वारे देखरेख वाढवणे, नमुना चाचणी वाढवणे, प्रयोगशाळेच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे आणि पौष्टिक पूरक आहारांची चाचणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यावर भागधारकांनी प्रकाश टाकला आहे, असे क्रीडा मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रमुख भागधारक मंत्रालये आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला. यामध्ये परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ),भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसआय), नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी), राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था (नाडा), भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय पॅरालिम्पिक समिती यांचा समावेश होता.
Comments are closed.