शेती, शिक्षण, आरोग्य यावर भर द्या
पंतप्रधान मोदींच्या हस्ते एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन : 300 हून अधिक कंपन्यांकडून अत्याधुनिक गॅझेट्सचे प्रदर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रमांपैकी एक असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’ला सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी सहभागी स्टार्टअप्सच्या मंडपांना भेट देऊन त्यांच्या नवोपक्रमांबद्दलची माहिती जाणून घेतली. ‘एआय’च्या माध्यमातून वास्तविक जीवनात शेती, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यात होणारे बदल असे असतील यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये सुरू झालेली एआय परिषद 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. शिखर परिषदेसोबत इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 देखील आयोजित केला जात आहे. पुढील चार दिवसात जगभरातील कंपन्या आपापले नवीनतम एआय प्रयोग सादर करतील. या परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्व निमंत्रित, तंत्रज्ञ, कंपन्या आणि शिष्टमंडळ प्रतिनिधींची पंतप्रधानांनी विशेष आभार मानले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये, “दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ सुरू होत आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या जगातील नेत्यांचे, व्यावसायिक नेत्यांचे, नवोन्मेषकांचे, धोरणकर्त्यांचे, संशोधकांचे आणि तंत्रज्ञान तज्ञांचे मी मनापासून स्वागत करतो. या शिखर परिषदेची थीम ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ अशी असून याचा अर्थ ‘सर्वांचे कल्याण आणि आनंद’ असा आहे. मानवतेच्या प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरण्याच्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे”, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रभावी वापर
सरकार वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्यासाठी ई-पुस्तके आणि एआय-आधारित शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता वाढविण्याच्या योजनेवर काम करत आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा लहान शहरे आणि ग्रामीण भागातील अंदाजे 57 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना व्यापणार आहे. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये दुर्गम वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना ई-पुस्तके, डिजिटल क्लिनिकल साहित्य आणि तांत्रिक अभ्यास साहित्य मिळविण्यात मोठ्या अडचणी येतात. म्हणूनच, सरकार एआयच्या मदतीने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सामग्री पोहोचवण्यासाठी एक धोरण विकसित करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे उपमहासंचालक (वैद्यकीय शिक्षण) बी. श्रीनिवास यांनी सांगितले. ई-पुस्तके आणि डिजिटल क्लिनिकल सामग्री प्रदान करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय वैद्यकीय ग्रंथालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे आणि सध्या देशभरातील अंदाजे 57 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ती राबविली जात आहे.
निर्णायक प्रयत्न आवश्यक : मुख्य आर्थिक सल्लागार
आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अवलंब आपोआप होणार नाही; त्यासाठी स्पष्ट धोरण आणि तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणात रोजगाराशी जोडण्याची वचनबद्धता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केले आहे. एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला त्यांनी व्हर्च्युअल प्रणालीद्वारे संबोधित केले. देशांनी मजबूत शिक्षण प्रणाली, उच्च-गुणवत्तेचे कौशल्य विकास, कामगार-केंद्रित सेवा क्षेत्रांचा विस्तार आणि नियामक अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णायक पावले उचलली पाहिजेत. एआयचा अवलंब हा एक सहयोगी प्रयत्न असावा, ज्यामध्ये खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि धोरणकर्त्यांचा संयुक्त सहभाग आवश्यक आहे, यावर नागेश्वरन यांनी भर दिला.
नोकऱ्या गमावण्याची भीती नाही
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नोकऱ्या जाण्याची भीती नेहमीच व्यक्त होत असते, परंतु तसे नाही. एआयच्या वापरामुळे नोकऱ्या किंवा रोजगार कमी होण्याची शक्यता मुळीच नाही. मात्र, कामाच्या स्वरुपात बदल होऊ शकतो, असे परिषदेत सांगण्यात आले. लोकांकडे आता ऐकण्यासाठी वेळ नाही. ते 50 मिनिटांचा पॉडकास्ट ऐकू शकत नाहीत. अगदी सारांश जाणून घेण्यासाठीही लोक एआय टूल्स वापरतात. ते तीन किंवा चार पानांचा सारांश काढतात. एआयच्या तंत्रज्ञानात अशाप्रकारे गोष्टी बदलत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
2.50 लाख लोकांची नोंदणी
सध्या सुरू असलेल्या इंडिया इम्पॅक्ट एआय समिट 2026 साठी देशभरातून आणि जगभरातून 2.50 लाखांहून अधिक सहभागींनी नोंदणी केली असून अपेक्षांपेक्षा खूपच जास्त असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी सोमवारी सांगितले. या कार्यक्रमासाठीचा उत्साह अभूतपूर्व आणि जबरदस्त होता. आयोजकांना इतक्या मोठ्या संख्येने अपेक्षा नव्हती, म्हणून नोंदणीवर कोणतेही निर्बंध लादण्यात आले नाहीत. नोंदणीकृत व्यक्ती 19 तारखेशिवाय सर्व दिवशी विविध सत्रांना उपस्थित राहू शकतात, त्यांच्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
…हा तर एआयचा महाकुंभ : केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद
भारताने दिल्लीमध्ये एआयच्या ‘महाकुंभा’चे आयोजन केले असून येथे जगभरातील नेते, स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि संशोधक पाच दिवसांच्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी एकत्र आले आहेत. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग या शिखर परिषदेकडे नजर ठेवून आहे. हा कार्यक्रम भारताच्या जागतिक तांत्रिक भूमिकेसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला राष्ट्रप्रमुख, तंत्रज्ञान नेते आणि उद्योग प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि संशोधक उपस्थित राहणार आहेत. याची तुलना प्रयागराजमधील कुंभमेळ्याशी करताना त्यांनी हा भारताने आयोजित केलेला एआयचा ‘महाकुंभ’ असून तो जागतिक सहकार्य आणि तांत्रिक नवोन्मेषाला एक नवीन दिशा देईल, असा आशावाद व्यक्त केला.
परिषदेत महत्त्वाचे काय?
► एआय इम्पॅक्ट एक्स्पो : 70,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात एक मेगा प्रदर्शन आयोजित केले आहे. 30 हून अधिक देशांतील 300 हून अधिक कंपन्या त्यांचे एआय गॅझेट्स आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करतील. वास्तविक जीवनात एआय कसे कार्य करते हे जनतेला पाहता येईल.
► शिक्षण आणि कौशल्य : विद्यार्थी आणि तरुणांसाठी ‘युवाई’ आणि ‘एआय फॉर ऑल’सारखे कार्यक्रम उपलब्ध असतील. या कार्यक्रमांद्वारे लोक त्यांचे शिक्षण आणि करिअर वाढवण्यासाठी एआय साधनांचा वापर कसा करायचा हे शिकू शकतील.
► दैनंदिन समस्यांवर लक्ष : एक्स्पोमध्ये एआय मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आले असून शेतीमध्ये पीक रोग ओळखण्यास, रुग्णालयांमध्ये उपचार सुधारण्यास आणि भाषा अनुवाद सुलभ करण्यास मदत करण्याची प्रक्रिया सहभागींना पाहता येईल.
► स्टार्टअप कंपन्यांशी बैठक : भारत आणि परदेशातील स्टार्टअप्स कंपन्या आपली अद्वितीय उत्पादने प्रदर्शित करतील. जनतेला या नवोन्मेषकांशी थेट संवाद साधता येईल आणि भविष्यातील तंत्रज्ञान कसे दिसेल हे समजून घेता येईल.
► प्रत्यक्ष स्वानुभव प्रात्यक्षिक : शिखर परिषदेत अनेक थीमॅटिक मंडप तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी लोकांना स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग आणि एआय ट्यूटर सारख्या एआय-संचलित मशीन्स आणि सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
Comments are closed.