राजस्थानमधील रासायनिक कारखान्यात स्फोट

8 जण जिवंत जळाले : अन्य चौघे होरपळले : भिवाडी-खुशखेडा येथे अग्नितांडव

वृत्तसंस्था/ अलवर

राजस्थानच्या अलवर जिह्यातील भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. आठ कामगार जिवंत जळाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच अन्य चार कामगार गंभीरपणे होरपळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये रेफर करण्यात आले आहे.

भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात मोठ्या स्फोटासह आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीची माहिती मिळताच जवळच्या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार आणि कर्मचारी तात्काळ बाहेर पडले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. स्फोटामुळे कामगारांचे मृतदेह आजूबाजूला विखुरले होते. मृतांची ओळख पटणेही अवघड झाले होते. तूर्तास बिहारच्या मोतिहारी जिह्यातील मिंटू, नितेश आणि सुजन अशा तीन मृतांची ओळख पटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री भजनलाल, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्यपालांसह अनेक लोकप्रतिनिधींनी या भयानक घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अग्निशमन दलाचे प्रभारी राजू खान यांनी घटनेबद्दलची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जी-1, 118 येथे असलेल्या कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना अनेक महिन्यांपासून बंद होता, परंतु परिसरात मोठ्या प्रमाणात कार्डबोर्ड साठवला होता. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या आतून धूर निघताना दिसला आणि आग वेगाने वाढत गेली. खबरदारी म्हणून, जवळपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आणि वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. कारखान्यात साठवलेल्या कार्डबोर्डला वेगाने आग लागल्याने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी संघर्ष करावा लागला. तासन्तास अथक परिश्रमानंतर, आग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बराच वेळ शीतकरण मोहीम सुरू ठेवण्यात आली.

स्फोटांमुळे घबराट, चौकशी सुरू

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आगीदरम्यान तीन ते चार मोठे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. हे स्फोट कारखान्यात साठवलेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झाले असावेत असा प्राथमिक संशय आहे. तथापि, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली की इतर काही कारणाने लागली याचाही पोलीस तपास करत आहेत. या दुर्घटनेत प्राथमिक अंदाजानुसार, लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

सुरक्षा मानके तपासण्याच्या सूचना

या घटनेनंतर प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील इतर युनिट्सना भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा मानके तपासण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. बंद असलेल्या कारखान्यात कोणती कामे सुरू होती आणि स्फोट कशामुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त करतानाच जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही भिवाडीच्या खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दु:खद असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Comments are closed.