प्रशासकीय जाच नको, सेवेतून स्वेच्छानिवृत्ती द्या! मध्य रेल्वेतील 73 लोको पायलट्सना नोकरी नकोशी!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य रेल्वेचे लोको पायलट्स व मोटरमन यांच्यावरील कामाचा ताण आणि प्रशासकीय जाचाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सेवेतील ताणतणाव असह्य झाल्याने सोमवारी एकाच वेळी तब्बल 73 लोको पायलट्सनी (मेल) स्वेच्छानिवृत्तीसाठी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे अर्ज केला. प्रशासकीय जाच नको, सेवेतून स्वेच्छानिवृत्ती द्या, अशी कळकळीची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे 73 लोको पायलट्सनी (मेल) संयुक्त अर्ज सादर केला आणि रेल्वेच्या सेवेतून मुक्त करण्याची विनंती केली. आम्ही रेल्वेला प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा दिली. असे असतानाही आम्हाला आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱया प्रशासकीय कार्यपद्धतीला तोंड द्यावे लागत आहे. हाच त्रास असह्य झाल्याने स्वेच्छानिवृत्ती मागण्याची वेळ आली आहे, असे लोको पायलट्सनी अर्जामध्ये नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकाऱयांना वारंवार निवेदने देऊनही तसेच तोंडी विनंती करूनही प्रशासकीय जाच आणि कामाच्या ताणाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला, अशी नाराजी अर्जाद्वारे व्यक्त केली आहे.

प्रशासनाकडून प्रचंड दबाव, कामाचा ताण

प्रशासनाकडून मनस्ताप दिला जात आहे. तसेच सततचा ताण आणि तणावपूर्ण कामामुळे मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन कर्मचाऱयांशी अत्यंत असंवेदनशीलपणे वागत आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या असह्य त्रासाचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होण्याबरोबच कौटुंबिक जीवन बिघडत चालले आहे, याकडेही लोको पायलट्सनी लक्ष वेधले आहे.

निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते!

लोको पायलट्सनी विश्रांतीगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छता, मूलभूत सुविधांची वानवा, पुरेशा विश्रांतीचा अभाव तसेच लॉबी, ट्रिप शेड व रनिंग रूममधील गैरसोयी आदी प्रश्नांचा पाढा स्वेच्छानिवृत्ती अर्जात वाचला आहे. एकाच वेळी 73 लोको पायलट्सनी रेल्वेतील नोकरी सोडण्याचा पवित्रा घेतल्याने मध्य रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

Comments are closed.