इराणमधून खामेनी यांना सत्ता सोडावीच लागेल, महिन्याभरात घेणार मोठा निर्णय; अमेरिकेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी इस्रायल दौऱ्यादरम्यान इराणबाबत एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. इराणमधील सत्तापरिवर्तनाचे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, इराणबाबतचा मोठा निर्णय आता फार दूर नाही आणि हा फैसला महिन्यांत नाही तर काही आठवड्यांतच होऊ शकतो.
तेल अवीव येथे माध्यमांशी बोलताना ग्राहम यांनी स्पष्ट केले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सत्ता कोणत्याही परिस्थितीत सोडावीच लागेल. १९७९ नंतर इराणचे नेतृत्व सध्या सर्वात कमकुवत स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, लष्करी ताकद क्षीण झाली आहे आणि तिथली जनता रस्त्यावर उतरली आहे, असे ते म्हणाले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतल्यानंतर ग्राहम यांनी इस्रायली जनतेला आश्वस्त केले की, इराणच्या मुद्द्यावर अमेरिका आणि इस्रायलमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सध्या दोन मार्ग खुले आहेत आहेत, एक राजनैतिक आणि दुसरा लष्करी. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणता मार्ग योग्य ठरेल, याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.