अजित पवार यांच्या अपघाताचा तपास महत्त्वाचा, राजकारण आणि विलीनीकरण दुय्यम; रोहित पवार यांची स्पष्ट भूमिका, उद्या पत्रकार परिषद घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेशन कोर्टातील हजेरीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले आहेत. माध्यमांनी यावेळी विलीनीकरण याबाबत विचारले असता, अजित पवार यांच्या अपघाताचा तपास हा सध्या सर्वात महत्त्वाचा विषय असल्याचे सांगत, राजकारण आणि विलीनीकरण या गोष्टी दुय्यम असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) संबंधित प्रकरणाचा तपास संपल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला (ED) कळवले असतानाही, ईडी हा विषय सोडायला तयार नाही. 13 तारखेला ईडीने न्यायालयात राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात जात या प्रकरणात अधिक खोलवर तपास करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, 26 जानेवारी रोजी दिल्लीतून आलेल्या आदेशानुसार, या प्रकरणात गुंतलेल्या कोणत्याही नेत्याला सोडू नका आणि गरज पडल्यास तपास अधिकारी बदला, अशा सूचना देण्यात आल्याचे समोर आले आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन काही काळ उलटलेला असतानाही, नुकत्याच 13 तारखेला ईडीने न्यायालयात राज्य सरकारच्या भूमिकेच्या विरोधात पवित्रा घेतला. या प्रकरणाचा आम्हाला अधिक खोलात जाऊन तपास करायचा आहे, अशी मागणी ईडीने न्यायालयाकडे केली आहे. सत्तेत असलेल्या नेत्यांच्या बाबतीतही ईडी आपली पकड ढिली करत नसल्याचे पाहून हे एक न सुटणारे कोडं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींनाही वेग आला असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पक्षाच्या 35 आमदारांसह 32 ते 33 पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन दिले असून, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी अधिकृत भूमिका घेतली आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच, रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, आमदारांचा पाठिंबा सुनेत्रा काकींनाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले आम्ही या विषयाला पूर्णविराम दिला आहे. अजितदादा जिवंत असताना त्यांच्यासोबत एनडीएमध्ये जायचे की दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे आमच्यामध्ये विषय झाला होता. याबाबत चर्चा झाली होती. मात्र, आता दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला कोणताही अर्थ उरलेला नाही. काही नेते स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांना जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
अजित पवार यांच्या अपघाताचा तपास हा सध्या सर्वात महत्त्वाचा विषय असल्याचे आहे. राजकारण आणि विलीनीकरण या गोष्टी दुय्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघाताशी संबंधित महत्त्वाचा दुवा असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याची बाब समोर आली असली तरी तो सुरक्षित होता आणि केवळ राजकारणासाठी त्याचा वापर केला जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. सरकारकडून या प्रकरणाचा तपास अत्यंत मंद गतीने सुरू असल्याचा आरोप करत, या अपघाताबाबतचे सर्व महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर आणि पुराव्यांवर प्रकाश टाकण्यासाठी उद्या सकाळी एक विस्तृत पत्रकार परिषद घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
Comments are closed.