Rajpal Yadav Case – राजपाल यादवला मोठा दिलासा; 12 दिवसांनी तिहार तुरुंगातून सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेले बॉलिवूडचे अभिनेते राजपाल यादव यांची अखेर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना त्यांना 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. सोमवारी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर, मंगळवारी संध्याकाळी राजपाल यादव तुरुंगाबाहेर आले. त्यांना पाहताच तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने मानवी दृष्टिकोन आणि कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. राजपाल यादव यांच्या पुतणीचे 19 फेब्रुवारी रोजी शाहजहानपूर येथे लग्न असून, त्यात त्यांचे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे वकिलांनी न्यायालयात पटवून दिले. मात्र, जामीन देण्यापूर्वी न्यायालयाने एक अट ठेवली होती. त्यानुसार तक्रारदार पक्षाला 1.5 कोटी रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. ही अट पूर्ण केल्यानंतर आणि ‘मुरली प्रोजेक्ट्स’ या कंपनीने रक्कम मिळाल्याची पुष्टी केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दरम्यान तुरूंगामधून बाहेर येताच राजपाल यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जर तुम्हाला काही कायदेशीर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वकिलाला विचारू शकता. 2027 मध्ये बॉलिवूडमध्ये मला 30 वर्षे पूर्ण होतील… हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीवर प्रेम करणारा प्रत्येक जण माझ्यासोबत आहे. जे सोशल मीडियावर नाहीत ते देखील माझे समर्थक आहेत. मागील 10 वर्षात कोर्टाने जिथे आदेश दिले आहेत तिथे मी हजर झालो आहे.जर माझ्यावर कोणतेही आरोप असतील तर मी त्यांना तोंड देण्यास नेहमीच तयार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

काय आहे 15 वर्षे जुने प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण 2010 मधील ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. राजपाल यादव यांनी दिल्लीच्या मुरली प्रोजेक्ट्स कंपनीकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, जे व्याजासह 9 कोटींच्या घरात पोहोचले होते. अनेक वेळा संधी देऊनही कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेतली होती. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांनी आत्मसमर्पण केले होते.

Comments are closed.