जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, पोलिसाकडूनचं गैरव्यवहार

जळगाव : जळगावात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाख 752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचं समोर आलं आहे. दक्षता पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानंच हा गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे. या पेट्रोल पंपाचं व्यवस्थापक पद पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याकडे होते. याप्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षता पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या व्यवहारात अपहार केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलीस दलाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे अपहार करणारा पोलीस उपनिरीक्षक सात दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकानेच पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपाच्या व्यवहारात मोठा अपहार केल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अपहारामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा असलेला दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.