ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; दुखापतीनंतर वर्ल्डकप स्टारचे पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात सलामीवीर प्रतीका रावलची निवड करण्यात आली आहे. घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला संघात स्थान देण्यात आले आहे. ब्रिस्बेनमध्ये सुरू होणारी ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या वर्षी विश्वचषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना प्रतीकाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि तिच्या जागी शफाली वर्मा संघात आली. भारताने त्या स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद जिंकले. दुखापतीनंतर प्रतीकाने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे तिची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत निवेदनात माहिती दिली की महिला निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी प्रतीकाची निवड केली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ दरम्यान झालेल्या दुखापतीतून ती पूर्णपणे बरी झाली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

ब्रिस्बेनमध्ये पहिला सामना खेळल्यानंतर उर्वरित दोन सामने होबार्टमध्ये खेळवले जातील. पर्थमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी प्रतीक आधीच संघात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे आणि उपकर्णधारपद स्मृती मानधना सांभाळणार आहे. संघात रेणुका ठाकूर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल यासारख्या प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे.

विश्वचषक विजेत्या संघातील बहुतेक खेळाडूंना या दौऱ्यासाठी कायम ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे आणि भारतीय संघ दमदार सुरुवात करण्यासाठी तयारी करत आहे.

भारताचा एकदिवसीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, प्रतीका रावल

Comments are closed.