भारत आणि फ्रान्स दरम्यान महत्त्वाचे करार
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात चर्चा
वृत्तसंस्था / मुंबई
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात दोन्ही देशांच्या संबंधांवर व्यापक चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. भारत आणि फ्रान्स, जगातील सर्वात ऊंच एव्हरेस्ट शिखर पार करुन जाऊ शकेल, अशा क्षमतेच्या युद्ध हेलिकॉप्टरची निर्मिती संयुक्तरित्या करणार आहेत. हा निर्णय याच चर्चेत घेण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. भारत आणि फ्रान्स यांच्यात मंगळवारी एकंदर 21 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यात ‘हॅमर’ क्षेपणास्त्राची निर्मिती हा अतिमहत्वाचा कराराचा समावेश आहे.
एअरबस एच 125 या हेलिकॉप्टरची निर्मिती भारत आणि फ्रान्स संयुक्तरित्या करणार असून एव्हरेस्ट शिखराची उंची गाठू शकणारे हे जगातील एकमेव हेलिकॉप्टर ठरणार आहे. कर्नाटकातील वेमगल येथे या हेलिकॉप्टरचे निर्मिती केंद्र स्थापन केले जाणार आहे. या निर्मिती केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन दोन्ही नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. या हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञानही कालांतराने भारताला हस्तांतरित होऊ शकते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील प्रगाढ मैत्रीचे उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांनी एकमेकांशी व्यापार, सहउत्पादन, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संरक्षण, ऊर्जानिर्मिती, कृमित्र बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकास आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. याच संदर्भांमध्ये दोन्ही देशांमध्ये मंगळवारी अनेक करार करण्यात आले.
संयुक्त पत्रकार परिषद
द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्रीचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असून आज ती अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारली आहे. दोन्ही देश अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर एकमेकांचे समर्थन करतात. भारताच्या संरक्षणसिद्धतेला फ्रान्सचे मिळणारे सहकार्य हे मोलाचे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी काढले. अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्रीची भलावण केली.
जागतिक अस्वस्थेवर उपाय…
सध्या जग एका अस्थिरतेच्या आणि अस्वस्थतेच्या कालावधीमधून जात आहे. ही अस्वस्थता दूर व्हावी, म्हणून भारत आणि फ्रान्स यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही देश जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणार आहेत. तसेच संरक्षण आणि दहशतवाद विरोध या क्षेत्रांमध्ये एकत्रितरित्या कार्य करण्यासंबंधीही दोन्ही देशांनी एकमत व्यक्त केले.
‘हॅमर’ क्षेपणास्त्र निर्मिती करार
हेलिकॉप्टरच्या संयुक्त निर्मितीच्या कराराप्रमाणेच दोन्ही देशांनी ‘हॅमर’ या अत्यंत प्रभावी क्षेपणास्त्राची संयुक्त निर्मिती करण्याचा कराराही केला आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात केली जाणार आहे. त्याच्या समावेशामुळे भारताच्या संरक्षण आणि आक्रमण क्षमतेत मोठी भर पडणार असून हे क्षेपणास्त्र भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या विरोधात भक्कम स्थितीत आणण्यास सक्षम आहे, असे मत अनेक संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले आहे. हे क्षेपणास्त्र जगातील एक अत्याधुनिक अस्त्र मानले जाते. त्यामुळे हा करार महत्वाचा आहे. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ आणि फ्रान्सची जगप्रसिद्ध संरक्षण साधन कंपनी ‘सॅफ्रान’ या कंपन्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्रची निर्मिती करणार आहेत, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची नियुक्ती
दोन्ही देश आपापल्या संरक्षण दलांमध्ये एकमेकांच्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती करणार आहेत. हा एक अभिनव करार असून त्यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण दलांना एकमेकांच्या सहकार्याने क्षमता संवर्धन करण्याची संधी मिळणार आहे. या शिवाय दोन्ही देशांमध्ये ऊर्जानिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकासासंदर्भातही विविध करार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
हॅमर क्षेपणास्त्राची संयुक्त निर्मिती
ड भारत आणि फ्रान्स यांच्यात झाले विविध क्षेत्रांमध्ये 21 महत्वपूर्ण करार
ड ऊर्जा निर्मिती, संरक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकास संयुक्तरणे होणार
ड सध्याच्या जागतिक अस्वस्थतेवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले जाणार
ड तंत्रज्ञान हस्तांतरण, तसेच व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातही महत्वाचे करार
Comments are closed.