पाकिस्तानात बॉम्बस्फोट : १४ जवान शहीद
गोळीबाराच्याही घटना, खैबर पख्तुनख्वात हिंसाचार
► वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाँबस्फोट मालिका आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये किमान 14 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. या प्रांतातील बंडखोर आणि पोलिस यांच्यात मोठ्या चकमकी होत असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनांमध्ये 3 नागरीकही प्राणास मुकले आहेत. मंगळवारी सकाळपासून या घटना होत आहेत.
मंगळवारी सकाळी पख्तुन बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याच्या अफगाणिस्तान सीमारेषेवर असलेल्या एका चौकीवर हल्ला केला. या भीषण बाँब हल्ल्यात ही चौकी पूर्णत: नष्ट झाली आहे. या चौकीत 11 सैनिक होते. ते मृत झाल्याचे वृत्त नंतर देण्यात आले आहे. बंडखोरांच्या आत्मघाती दलाच्या काही हस्तकांनी या चौकीच्या भिंतीवर स्फोटकांनी भरलेली एक दुचाकी आदळविली. त्यामुळे ही भिंत पूर्णत: कोसळली. पाकिस्तान सेनेचे अनेक सैनिक या घटनेत मृत्यूमुखी पडले. 14 सैनिक ठार झाल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या सैन्यदलानेही दुजोरा दिला आहे.
आजूबाजूच्या इमारतीही हानीग्रस्त
खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या बाजौर जिल्ह्यात ही चौकी होती. हल्ल्यामुळे ती पूर्णत: नष्ट झाली. आतील सैनिक प्रतिकारही करु शकले नाहीत, इतका हा हल्ला भयानक होता. स्फोटाच्या दणक्यामुळे या चौकीपासून काही अंतरावर असलेल्या अनेक रहिवासी इमारतींची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अन्य अनेक इमारतींना तडे गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलोच लिबरेशन सैन्याच्या काही हस्तकांनी सैनिकांच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या संघटनेच्या प्रतिपादनानुसार त्या हल्ल्यात 200 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. मात्र, पाकिस्ताने केवळ 17 सैनिक मारले गेल्याचा आणि मोठ्या प्रमाणात बंडखोरांना मारल्याचा दावा केला होता. त्यानंतर ही अशा प्रकारची दुसरी घटना पाकिस्तानात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आणखी तीन सैनिक ठार
याच प्रांतातील अन्य स्थानी झालेल्या बंडखोर आणि सैनिक यांच्या चकमकीत तीन सैनिक आणि तीन नागरीक यांचा बळी गेला आहे. बंडखोरांच्या लपण्याच्या स्थानाची झडती घेण्यात येत असताना त्यांनी केलेल्या गोळीबारात हे सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रशासनाने या संबंधीची माहिती दिली असून चौकशीचा आदेशही दिला आहे. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे वृत्त आहे.
चीनची गुंतवणूक धोक्यात
खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांमधील प्रकल्पांसाठी चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, चीनच्या या गुंतवणुकीला या दोन्ही प्रांतांमधील स्थानिक नागरीकांचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे या प्रांतांमधील बंडखोर या प्रकल्पांवर हल्ले करतात. त्यामुळे त्यांचे काम धिम्म्या गतीनेच होत आहेत. या प्रकल्पांचे कामकाज थंडावल्याने चीनची पाकिस्तानातील गुंतवणूक धोक्यात आली असून हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का आहे.
Comments are closed.