राहुल गांधींवरील मानहानीचा खटला रद्द
उच्च न्यायालयाकडून दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये तत्कालिन भाजप सरकारविरोधात ‘भ्रष्टाचार रेट कार्ड’ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याविरोधात भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. मंगळवारी उच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धचे प्रकरण रद्द केले.
राज्य काँग्रेसने मागील भाजप सरकारविरुद्ध प्रसिद्ध केलेली जाहिरात राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. याला राहुल गांधींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती सुनीलदत्त यादव यांच्या नेतृत्वातील पीठाने खटल्याचे स्वरुप आणि कागदपत्रांची पडताळणी करून राहुल गांधींविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द केला.
5 मे 2023 रोजी काही वृत्तपत्रांमध्ये राज्य काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीत मागील भाजप सरकारविरुद्ध 40 टक्के कमिशनचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात भाजपने कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी), मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
Comments are closed.