सुकमामध्ये 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

सुरक्षा दलांच्या प्रयत्नांना मोठे यश

वृत्तसंस्था/ सुकमा

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुकमा येथे मंगळवारी 22 नक्षलवाद्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सरकारचे नक्षलवाद उर्न्मूलन धोरण आणि पूना मारगेम पुनर्वसन अभियानाने प्रभावित होत या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील होत सरकारसोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नक्षलवाद्यांच्या पोकळ विचारसरणीमुळे त्रस्त झाल्यानेच आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुकमा जिल्ह्यात सातत्याने नक्षलविरोधी अभियान, नव्या सुरक्षा तळांची स्थापना, रस्तेसंपर्काचा विकास अणि विकासकामांमुळे नक्षलवादी संघटनेचा प्रभाव कमकुवत पडला आहे. याचाच परिणाम म्हणजे नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून पुनर्वसन धोरणावर विश्वास दाखविला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नक्षली संघटना आता कमकुवत

नक्षली संघटना आत कमकुवत झाल्या आहेत. 22 नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ देण्यात येणार आहे. या पूर्ण प्रक्रियेत डीआरजी सुकमा, आरएफटी जगदलपूर, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनची मुख्य भूमिका राहिली असल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली आहे. तर सुरक्षा यंत्रणांनुसार आगामी काळात आणखी नक्षलवादी आत्मसमर्पण करू शकतात.

मार्च 2026 ची कालमर्यादा

केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलवादाच्या खात्म्यावरून कालमर्यादा निश्चित केली आहे. सरकारच्या कालमर्यादेनुसार छत्तीसगड समवेत पूर्ण देशात नक्षलवादापासून 31 मार्च 2026 पर्यंत मुक्ती मिळणार आहे.

Comments are closed.