वाढत्या मुस्लिम लोकसंख्येबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता

संघर्षादरम्यान काही लोक बांगलादेशचे करू शकतात समर्थन

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मंगळवारी राज्यात मुस्लीम लोकसंख्येतील वाढीवरून चिंता व्यक्त केली. आसामची वर्तमान स्थिती ‘अत्यंत चांगली नाही’ आणि यामागे मोठ्या प्रमाणावर झालेली अवैध घुसखोरी जबाबदार आहे. आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्येचा मोठा हिस्सा बांगलादेशातून अवैध स्वरुपात आला आहे. ही घुसखोरी मुख्यत्वे काँग्रेस सत्तेवर असताना झाल आहे. काँग्रेस सरकारांनी सीमांची योग्यप्रकारे देखरेख न केल्याने राज्याचे लोकसंख्यात्मक संतुलन प्रभावित झाल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

राज्याचे काही लोक भविष्यात कुठल्याही संघर्षाच्या स्थितीत बांगलादेशचे समर्थन करू शकतात, यामुळे सुरक्षाविषयक धोका निर्माण होऊ शकतो. अवैध घुसखोरी आसाम आणि पूर्व ईशान्य क्षेत्राच्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. आमचे सरकार राज्याची ओळख, जमीन आणि साधनसामग्रीच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलत आहे. यात अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी अभियान, सीमेवरील देखरेख वाढविणे आणि एनआरसीला अपडेट करणे सामील असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

ऐतिहासिक चुका सुधारण्यासाठी प्रतिबद्ध

शर्मानी काँग्रेसवर ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ करण्याचा आरोप केला आहे. तुष्टीकरणाच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतर झाले. तर आमचे सरकार ऐतिहासिक चुका सुधारणे आणि राज्याची सुरक्षा तसेच स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे हेमंत विश्व शर्मा यांनी म्हटले आहे.

विरोधकांकडून टीका

तर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांनी शर्मा यांच्या आरोपाला चुकीचे आणि समाजाला विभागणारे ठरविले आहे. शर्मा यांचे हे वक्तव्य जनतेचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून हटविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.

आसाम आंदोलन आणि करार

आसाममध्ये अवैध घुसखोरीचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. आसाम आंदोलनादरम्यान अवैध घुसखोरीच्या विरोधात  मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यांवर उतरले होते. या हिंसक आंदोलनानंतर 1985 साली आसाम करारावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यात अवैध घुसखोरांची ओळख पटवून कारवाईची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून हा मुद्दा आसामचे राजकारण आणि निवडणूक चर्चेचा महत्त्वाचा हिस्सा राहिला आहे.

Comments are closed.