गैरसमज दूर करूया, मुदतीचा विमा फक्त पुरुषांसाठी नाही, तर महिलांसाठीही अत्यावश्यक
बजाज लाइफ इन्शुरन्स: आर्थिक सुरक्षिततेबद्दल बोलताना मुदतीचा विमा (टर्म इन्शुरन्स) हा अनेकदा मुख्य कमावत्या व्यक्तीसाठी असतो, असा समज दिसून येतो. परंपरेने कमावण्याची ही भूमिका पुरुषांकडेच असल्यामुळे हा गैरसमज अधिक दृढ झाला आहे; पण आजच्या काळात स्त्रिया स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर स्वीकारत आहेत. काही ठिकाणी त्या एकमेव आधार आहेत, तर अनेक ठिकाणी त्या समसमान योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही सर्वसमावेशक आयुर्विम्याचे महत्त्व तितकेच मोठे आहे. विशेषतः एकल मातांसाठी मुदत-विमा हा पर्याय नसून ते अत्यावश्यक सुरक्षा कवच आहे. त्यातून त्यांच्या मुलांचे व अवलंबितांचे जीवन विपरीत परिस्थितीतही सुरक्षित राहते.
कल्पना करा, एक एकल माता, तिचे पाच वर्षांचे मूल, वयोवृद्ध आई-वडील आणि घरकर्जाचे हप्ते फेडण्याची जबाबदारी तिच्याच खांद्यावर. तिच्या अनुपस्थितीत गृहकर्जाचे हप्ते, शालेय फी किंवा वैद्यकीय खर्च कोण भागवणार? अशा वेळी मुदतीचा विमा पुढे येतो. परवडणाऱ्या हप्त्यांत तो मजबूत आर्थिक सुरक्षाकवच तयार करतो. यामुळे मुलांच्या शैक्षणिक संधी, परदेशी शिक्षणाची स्वप्ने किंवा व्यवसाय सुरू करण्याची उद्दिष्टे आर्थिक अडथळ्यांमुळे थांबत नाहीत. विम्याची रक्कम दैनंदिन खर्च, कर्जफेड आणि कुटुंबाच्या जगण्याची पातळी टिकवण्यासाठी उपयोगी पडते.
एकल मातांसाठी त्यांच्या मुलांचे भविष्य, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा या सगळ्याचा पाया त्यांच्या योग्य नियोजनावरच उभा असतो. जीवनात कधीही कोणतीही परिस्थिती येऊ शकते आणि जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर असतात, तेव्हा पर्याय म्हणून दुसरे काहीच नसते. म्हणूनच एकल मातांसाठी मुदतीचा विमा हा तिचा सर्वात मोठा आधार ठरतो. अशा योजना कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण देतात. त्यामुळे चालू खर्च आणि भविष्यातील सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा समतोल राखता येतो.
एकल मातेच्या खांद्यावर घरभाडे, शालेय फी, वैद्यकीय खर्च, रोजचे खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. तिचे अकाली निधन झाल्यास त्याचा आर्थिक फटका तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांना तात्काळ आणि मोठ्या प्रमाणात बसू शकतो.
आजच्या काळात मुदतीचा विमा अधिक सोयीस्कर आणि वैयक्तिक गरजांना अनुरूप स्वरूपात मिळतो. एकल मातांसाठी अशा पॉलिसी उपयुक्त ठरतात. त्या केवळ मृत्युपश्चात लाभच देत नाहीत, तर त्यांच्यासाठी खास सेवा आणि अतिरिक्त संरक्षणही पुरवतात. उदा. –
- मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी संरचित हप्त्यांमध्ये लाभ, जे आई नसतानाही मुलाचे भविष्य सुरक्षित ठेवतात.
- आरोग्य व्यवस्थापन सेवा, उदा. दुसऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, आरोग्याविषयी सल्लासेवा, डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म्स.
- महिलांसाठी विशिष्ट गंभीर आजारांसाठीचे कवच, उदा. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कर्करोग किंवा ल्युपस यांसारख्या आजारांवरील खर्चाची सोय.
- अशा सुविधा मिळाल्यावर साधा मुदतीचा विमा हा महिलाकेंद्रित सर्वसमावेशक संरक्षण योजनेत रूपांतरित होतो.
कधी विमा घ्यावा आणि किती रकमेचे संरक्षण पुरेसे आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. उत्तर अगदी सोपे आहे. जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घ्यावा. वय आणि आरोग्याचा विचार करता उशीर केला, तर प्रीमियम वाढतो आणि कवचाचा कालावधी कमी होतो. संरक्षण किती घ्यावे, यासाठी साधा नियम म्हणजे वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट रक्कम. त्यानंतर आपण घेतलेले हे कवच शिक्षण, कर्जफेड किंवा कुटुंबाच्या इतर गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे का हेही ठराविक काळानंतर तपासून घ्यावे.
मुदतीचा विमा ही वाईटाची अपेक्षा ठेवून बनविलेली योजना नाही, तर सुज्ञपणे केलेले ते आर्थिक नियोजन आहे. एकल मातेसाठी हा केवळ विमा नसून तिच्या मुलाला सुरक्षित ठेवण्याचे, तिच्या स्वतःच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आणि स्वप्नांना पुढे नेण्याचे विमा कंपनीचे आश्वासन आहे. म्हणूनच समर्पित विमा योजना ही आता पर्याय राहिलेली नाही, तर प्रत्येक एकल मातेसाठी ती अत्यावश्यक सुरक्षा कवच आहे.
(अमित जैस्वाल, चिफ डिस्ट्रीब्युशन ऑफिसर – प्रोपर्टीअरी सेल्स फोर्स बजाज लाइफ इन्शुरन्स)
आणखी वाचा
Comments are closed.