सिव्हिलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी बालकाला मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा वर्षीय बालकाला सिव्हिल रुग्णालयाने जीवदान दिले आहे. सिद्धार्थ वाघ असे या चिमुकल्याचे नाव असून हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे प्रशिक्षित डॉक्टरांच्या पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आणि त्याचा जीव वाचवला. आपला चिमुकला सुखरूप असल्याचे पाहताच सिद्धार्थच्या आईचे डोळे पाणावले. तिने चिमुकल्याला कुशीत घेऊन डॉक्टरांचे आभार मानले.

शहापूरमधील खारवली गावात राहणारा सिद्धार्थ वाघ हा सहा वर्षांचा चिमुकला घराच्या अंगणात खेळत होता. तो चेंडू आणण्यासाठी पुढे गेला असता गावातील भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या तोंडाचा व डोक्याचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला कुटुंबीयांनी तत्काळ ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉक्टरांच्या टीमची करामत

चिमुकल्याची अवस्था पाहून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना प्रशिक्षित डॉक्टरांना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लास्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, डॉ. प्रियंका महांगडे, डॉ. ओंकार भोसले व डॉ. सुशील दुबे या टीमने योग्य उपचार करत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. वेळेत शस्त्रकिया केल्यामुळे चिमुकला बचावला असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. धाकड यांनी सांगितले.

Comments are closed.