टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार, यूएईचा 6 विकेट्सने पराभव

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आजचा (बुधवार, १८ फेब्रुवारी) पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएई यांच्यात खेळला गेला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला असून त्यात दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात यूएईने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२३ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेने ते लक्ष्य १३.२ षटकातच पूर्ण केले. यामध्ये त्यांचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने ४ षटकात १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यामुळे तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने त्यांचे साखळी फेरीचे सर्व ४ सामने जिंकले आहेत. तसे ते आधीच सुपर-८मध्ये पोहोचले आहेत, मात्र त्यांचीही कामगिरी पाहता ते बाकी संघांना सुपर-८मध्ये चांगलीच टक्कर देतील.
यूएई आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यामुळे हा सामना एक औपचारिकता ठरला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यूएईचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकले नाहीत. त्यांच्या केवळ चार खेळाडूंनी दुहेरी धावसंख्या केली. त्यातील अलिशान शराफूची ४५ धावांची खेळी सर्वोच्च ठरली. त्याने ३८ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकार मारला. त्यामुळे यूएईने २० षटकात ६ विकेट्स गमावत १२२ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स गमावल्या. त्यामध्ये डेवाल्ड ब्रेविसची ३६ धावांची खेळी सर्वोच्च ठरली. त्याने ह्या धावा २५ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने केल्या. रियान रिकल्टनेही १६ चेंडूत ३० धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेच्या साखळी सामन्यात कॅनडाला ५७ धावांनी, सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला हरवले (डबल सुपर ओव्हर), न्यूझीलंडला ७ विकेट्सने आणि आता यूएईला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे २०२६ च्या टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे ४ सामन्यात ४ विजय झाले आहेत. यूएईने ४ पैकी एक सामना जिंकला. त्यांनी कॅनडाला ५ विकेट्सने पराभूत केले होते.
दक्षिण आफ्रिकेचे सुपर-८ सामने पुढीलप्रमाणे- पहिला सामना २२ फेब्रुवारीला भारताविरुद्ध, दुसरा सामना २६ फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध आणि तिसरा सामना १ मार्चला झिम्बाब्वेविरुद्ध आहेत.
Comments are closed.