Ranji Trophy – अखेर 67 वर्षांचा वनवास संपला… जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या फायनलमध्ये
एकीकडे T20 World Cup 2026 चा थरार सुरू आहे, तर दुसरीकडे रणजी करंडकात जम्मू-कश्मीरने मोठा धमाका करत 67 वर्षांचा वनवास संपुष्टात आणला आहे. रणजी करंडकाच्या सेमी फायनलमध्ये जम्मू-कश्मीर आणि बंगाल यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात जम्मू-कश्मीरने बंगालचा 6 विकेटने पराभव केला आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये थाटात एन्ट्री केली.
जम्मू-कश्मीरने 1959-60 साली रणजी करंडकात खेळण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना एकदाही रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की करता आली नाही. 67 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर तो क्षण आला ज्याची जम्मू-कश्मीरच्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीला ओढ लागली होती. बंगालविरुद्ध पार पडलेल्या सेमी फायनलचा सामना जम्मू-कश्मीरसाठी तितका सोपा नव्हता. दोन वेळा रणजी करंडकावर नाव कोरण्याची किमया बंगालने यापूर्वी साधली आहे. त्यामुळे सामना अगदी ठासून झाला. मात्र, या सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली जम्मू-कश्मीरच्या आकिब नबीने. त्याने दोन्ही डावांमध्ये मिळून 9 फलंदाजांना तंबूत धाडलं.
जम्मू आणि काश्मीर इतिहासात प्रथमच रणजी ट्रॉफी फायनलमध्ये पोहोचले.🔥
औकिब नबी दारने सामन्यात ५ आणि ४ विकेट्स घेतल्या.✨
बंगालकडून मोहम्मद शमीने 8 आणि 1 बळी घेतले.💥#ranjitrophy2026 #जम्मू आणि काश्मीर #औकिबनबीदार #मोहम्मदशमी pic.twitter.com/nh1IXk4A14— क्रिक इनसाइट्स (@cricinsights1) 18 फेब्रुवारी 2026
बंगालने प्रथम फलंदाजी करताना सर्वगडी बाद 328 धावा केल्या होत्या. सुदीप कुमार घरामी (146) आणि अभिमन्यू इश्वरन (49) यांनी धडाकेबाज फलंदाजी केली आणि संघाला 300 पार नेलं. प्रत्युत्तरात जम्मू-कश्मीरचा पहिला डाव 302 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शामीने घातक गोलंदाजी करत 8 फलंदाजांची विकेट घेतली. त्यामुळे बंगालला आघाडी घेण्याची नामी संधी होती. मात्र, बंगालच्या सुसाट फलंदाजीला वेगवान गोलंदाज आकिब नाबी आणि सुनील कुमार यांनी ब्रेक लावला. दोघांनी 4-4 विकेट घेतल्यामुळे बंगालचा संपूर्ण संघ अवघ्या 99 धावांवर बाद झाला. त्यामुळे जम्मू-कश्मीरला जिंकण्यासाठी अवघ्या 126 धावांची आवश्यकता होती. जम्मू-कश्मीरने या माफक आव्हानाचा पाठलाग 4 गड्यांच्या मोबदल्यात केला आणि ऐतिहासिक विजय साजरा करत फायलनमध्ये धडक मारली.
Comments are closed.