8/90 नंतरही शांतता, आता उत्तर पाहिजेच! सिलेक्टर्स मोहम्मद शमीला देणार का संधी?

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याने रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात ३७ पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तो बंगालकडून खेळला. त्याने या स्पर्धेच्या जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. संघाने सामना गमावला असला तरी शमीची ही कामगिरी नजरा वळवत आहेत. उत्तम कामगिरी करूनही तो भारतीय संघाच्या बाहेर आहे. आता हे प्रकरण केवळ फॉर्म किंवा फिटनेसपर्यंत मर्यादित राहिलेले नाही.

जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात शमीने हाताला टेप लावत गोलंदाजी केली. राष्ट्रीय संघाबाहेर अधिक दिवस असूनसुद्धा त्याच्या गोलंदाजीत लय आणि भेदक मारा तसाच दिसला. नव्या चेंडूने त्याने सुरूवातीला २ विकेट्स घेतल्या, त्यानंतर १४३ धावांची भागीदारी तोडण्याचे काम केले आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांच्या विकेट्सही काढल्या. त्याच्या पूर्ण स्पेलमध्ये अनुभव, फिटनेस आणि तिच आक्रमकता दिसली. यामध्ये त्याने पहिल्याच डावात ९० धावा देत ८ विकेट्स घेतल्या.

या रणजी ट्रॉफीच्या हंगामात शमी ३७ पेक्षा अधिक विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. कारकिर्दीत ५ विकेट्स घेण्याची त्याची ही १५वी वेळ आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी २०१२-१३च्या हंगामात आली होती. तेव्हा त्याने ७९ धावांवर ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते.

शमीने या हंगामाच्या सय्यद मुश्ताक अलीमध्ये 16 विकेट्स आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये 15 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

शमीचा फिटनेस आणि त्याची कामगिरी पाहून निवडकर्त्यांनी त्याला एक संधी देणे आवश्यक आहे. ऑक्टोबरमध्ये भारताचा न्यूझीलंड दौरा आहे. भारताने २००९नंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. तसेच शमी दोनदा न्यूझीलंड दौऱ्यात खेळला आहे. त्यामध्ये ४ कसोटीत १५ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर त्याचा अनुभव कामी येईल.

तसेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याची योजना असल्याने निवडकर्ते कदाचित युवा गोलंदाजांना संधी देतील. यामुळे न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याला संघात घेतले, तर तो त्याचा शेवटचा दौरा ठरण्याची शक्यता आहे.

शमीने भारतासाठी शेवटचा सामना २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर तो सातत्याने स्थानिक स्पर्धामध्ये खेळत आहे. ३५वर्षीय या खेळाडूने मागील सामन्यात अर्धशतकही केले होते. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात आरपी सिंगनेही उपस्थिती दर्शवली होती. तेव्हा तो शमीशी काहीतरी चर्चा करताना दिसला. यामुळे शमीचे संघपुनरागमन होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या. आता अजित आगरकर आणि बाकी निवडकर्ते त्याच्याबाबत काय निर्णय घेतील याकडे लक्ष असेल.

Comments are closed.