बाबर आझमची मोठी फजिती; नामीबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघानेच दाखवली जागा!

पाकिस्तानने टी-२० विश्वचषक २०२६ च्या आपल्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात नामीबियासमोर २०० धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानसाठी हा ‘करा किंवा मरा’ असा सामना आहे, ज्यामध्ये पाक संघ कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून सुपर-८ चे तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने स्वतःच आपला स्टार फलंदाज बाबर आझमचा अपमान केला.

​पाकिस्तानने या सामन्यासाठी बाबरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश तर केला, पण त्याला फलंदाजीसाठी पाठवलेच नाही आणि तो डगआउटमध्ये बसून फक्त सामना पाहत राहिला. पाकिस्तानी संघाच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांसह समालोचकही (कमेंटेटर्स) थक्क झाले.

​खरे तर, बाबर आझम सहसा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, पण नामीबियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी ख्वाजा नफेला मैदानात उतरवण्यात आले. ख्वाजा ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर चाहत्यांना वाटले की आता बाबर येईल, पण संघाने शादाब खानला फलंदाजीसाठी पाठवले. शादाबने २२ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या आणि साहिबजादा फरहानसोबत चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची शानदार भागीदारी केली.

​लोक म्हणत आहेत की, जर बाबरला फलंदाजीच करायची नव्हती, तर मग त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश का केला गेला? विशेष म्हणजे, बाबरने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत ६६ धावा केल्या आहेत आणि भारता विरुद्धच्या गेल्या सामन्यात तो केवळ ५ धावाच करू शकला होता.

च्यासाहिबजादा फरहानचे शानदार शतक

​सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानसाठी सलामीवीर साहिबजादा फरहानने शानदार शतकी खेळी केली. त्याने ५८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. फरहानच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत तीन गडी गमावून १९९ धावा केल्या आणि नामीबियासमोर २०० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

​फरहानने पहिल्या विकेटसाठी सैम अयूब (१४) सोबत ४० धावांची आणि दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार सलमान अली आगा (३८) सोबत ६७ धावांची भागीदारी केली. फरहानचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. याचसोबत तो टी-२० विश्वचषकात पाकिस्तानसाठी शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात अहमद शहजादने शतक ठोकले होते.

Comments are closed.