राफेल लढाऊ विमानाच्या प्रकल्पात हेरगिरी, आरोपी कर्मचारी फ्रान्स पोलिसांच्या ताब्यात
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असताना फ्रान्समध्ये मोठी घटना घडली आहे. फ्रान्समधील दसॉल्ट कंपनीच्या राफेल लढाऊ विमानाच्या प्रकल्पात हेरगिरी झाल्याचे समोर आले आहे. कॅमेरा असलेला चश्मा घालून प्रकल्पात हेरगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले आहे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला फ्रान्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिंदुस्थान-फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाच्या निर्मितीबाबत डील होत असताना फ्रान्समधल्या हेरगिरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. फ्रान्समधील राफेल लढाऊ विमान निर्मितीच्या प्रकल्पात हेरगिरी करताना एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आले आहे. आरोपी कर्मचारी कॅमेरा असलेला चश्मा लावून काम करत होता. अशा प्रकारच्या चश्म्यावर बंदी असतानाही तो घालून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही घटना अतिशय संवेदनशील असल्याने आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिंदुस्थानात ११४ राफेल लढाऊ विमान निर्मितीच्या कराराला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली असताना फ्रान्समधील घटना समोर आली आहे. हिंदुस्थान शिवाय युएई आणि इजिप्त या देशांनीही राफेल विमान खरेदी केले आहे. इंडोनेशियानेही अलिकडेच फ्रान्ससोबत राफेल विमान खरेदीचा सौदा केला आहे.
Comments are closed.