शून्याची हॅट्ट्रिक! अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, असा नकोसा रेकॉर्ड करणारा ठरला पहिला भारतीय सलामीवीर

नेदरलँड्सविरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, या सामन्यातही भारताची सुरुवात खराब झाली. आजारपणातून सावरून मैदानात परतलेला सलामीवीर अभिषेक शर्मा, (Abhishek Sharma) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील आपल्या सलग तिसऱ्या सामन्यात खातेही उघडू शकला नाही. यामुळे त्याच्या नावावर एका अत्यंत लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
USA विरुद्ध पहिल्या सामन्यात अभिषेक शून्य धावांवर बाद झाला. तर, नामिबिया विरुद्ध प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही. नंतर पाकिस्तान विरुद्ध पुनरागमन केले, पण पुन्हा शून्यावर माघारी परतला. नेदरलँड्स विरुद्ध आजच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. या सलग तीन ‘डक’मुळे (शून्य धावा) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरनंतर (Washington Sundar) असा नकोसा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच, टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय सलामीवीर बनला आहे.
सुपर-8 फेरीपूर्वी अभिषेक शर्मा आणि टीम इंडियावर दडपण वाढले आहे, कारण भारताला हवी तशी मजबूत सुरुवात मिळत नाहीये. साखळी फेरीतील हा भारताचा शेवटचा सामना आहे. भारतीय संघ आपला पुढचा सामना सुपर-8 मध्ये 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारताला स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी अभिषेक शर्माला फॉर्ममध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत इशान किशन (Ishaan kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या चांगल्या कामगिरीमुळे संघावरील दबाव काहीसा कमी झाला आहे.
Comments are closed.