'एआय कॉन्फरन्स'साठी सेलिब्रिटींचे आगमन

पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्वागत :

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जागतिक परिषदेसाठी जगातील अनेक राष्ट्रनेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांचे आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अशा अनेक विख्यातांचे स्वागत केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि अन्य अनेक दिग्गजांचा या परिषदेला सहभाग लाभला आहे.

एआयसंबंधीची प्रथम परिषद ब्रिटनमध्ये 2023 मध्ये झाली होती. त्यानंतर 2025 मध्ये ती फ्रान्समध्ये पार पडली. आता याच मालिकेतील तिसरी परिषद भारतात 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या काळात होत आहे. भारत या परिषदेत आपल्या कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकासाचे सामर्थ्यही प्रदर्शित करत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा जगावर काय प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे जगात कोणत्या क्षेत्रांमध्ये कोणती परिवर्तने घडणार आहेत, यावर या परिषदेत प्रकाश टाकला जाणार आहे. भारत ही या तंत्रज्ञानातील उगवती शक्ती असल्याने आणि भारताकडे या तंत्रज्ञानासाठी मोठी बाजारपेठ असल्याने ही परिषद महत्वाची आहे.

भारत-फ्रान्स संशोधन वर्षाचे उद्घाटन

भारताच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे या परिषदेसाठी बुधवारी दिल्लीत आगमन झाले. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑन इनोव्हेशन-2026’चे (भारत-फ्रान्स संशोधन वर्ष-2026) उद्घाटन केले. भारत संशोधन करत आहे, की नाही, हा प्रश्न नाही. भारतासह कोण संशोधनकार्यात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असे गौरवोद्गार काढून मॅक्रॉन यांनी भारताच्या तंत्रवैज्ञानिक संशोधनातील प्रगतीची प्रशंसा केली. तंत्रवैज्ञानिक संशोधन कार्यात फ्रान्स भारताचा भागीदार होण्याची इच्छा बाळगून आहे. फ्रान्स भारतासह आहे आणि आम्ही भारताची संगत कधीही सोडणार नाही, असे आश्वासक प्रतिपादनही त्यांनी केले.

विद्यार्थी-संशोधकांना एकत्र आणणार

भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्तरित्या तंत्रवैज्ञानिक संशोधन कार्यात हनुमानउडी घेण्यासाठी एक व्यापक योजना साकारली आहे. या योजनेच्या अंतर्गत दोन्ही देश आपल्या देशांमधील विद्यार्थी आणि संशोधक यांना एकत्र आणणार आहेत. या योजनेत दोन्ही देशांमधील उद्योगांनाही सामावून घेतले जाणार आहे. या कार्यात फ्रान्स भारताच्यासह असेल, अशी स्पष्टोक्ती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली.

भारत मडपम्मधील लगबग

कृत्रिम बुद्धीमत्ता जागतिक परिषदेचा’ (एआय समिट) उद्घाटन सोहळा 16 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला. ही परिषद 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परिषदेचा कालावधी एक दिवसाने वाढविला जाण्याचीही योजना असून तसे झाल्यास ती 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. बुधवार हा या परिषदेचा तिसरा दिन होता. बुधवारीही अनेक राजकीय आणि तंत्रवैज्ञानिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे आगमन झाले. ही परिषद ‘भारत मंडपम्’ या स्थानी होत आहे.

एकत्र एआय छायाचित्र

या परिषदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एकत्रितरित्या दोघांच्या ‘एआय’ निर्मित छायाचित्राचे अनावरण केले. ‘व्हेन फ्रेंड्स् कनेक्ट, इनोव्हेशन फॉलोज’ असे सूचक शीर्षक या छायाचित्राला देण्यात आले आहे. हे छायाचित्र बुधवारचे या परिषदेचे वैशिष्ट्या ठरले होते.

अनेक नेत्यांचे आगमन

या परिषदेसाठी अनेक युरोपियन देशांच्या प्रमुखांचे आगमन होत आहे. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रीनी, कझाकिस्तानचे नेते ओल्झास बेक्टेनोनोव्ह, फिनलंडचे नेते पीटेरी ओर्पो, इस्टोनियाचे अध्यक्ष अलार कारीस, सेशल्सचे उपाध्यक्ष सॅबॅस्टियन पिल्लेय, मॉरिशसचे नेते नवीनचंद्र रामगुलाम, क्रोएशियाचे नेते अंद्रेज प्लँक़ोव्हिक, संयुक्त राष्टसंघाचे महासचिव अंटोनिओ गुट्रेस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालीना जॉर्जिएव्हा, नेदरलंडस्चे नेते डिक स्कॉफ आदी नेते या परिषदेसाठी आले असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

एआय परिषदेचे भरगच्च कार्यक्रम

ड ‘भारत मंडपम्’ येथील एआय परिषदेसाठी अनेक मान्यवयांची उपस्थिती

ड परिषदेच्या तिसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम, अनेक योजनांच्या घोषणा

ड भारत-फ्रान्स संशोधन वर्षाचे पंतप्रधान मोदी-मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन

Comments are closed.