जम्मू-कश्मीरची हिमालयासारखी कामगिरी, प्रथमच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत
67 वर्षांच्या रणजी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू-काश्मीर संघाने उपांत्य फेरीत बलाढय़ बंगालवर सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि प्रथमच अंतिम फेरी धडक मारण्याची हिमालयासारखी उत्तुंग कामगिरी करत इतिहास रचला. बंगालचे 126 धावांचे माफक लक्ष्य जम्मू-काश्मीरने 34.4 षटकांत चार विकेट गमावत सहज पार केले. वंशज शर्मा (नाबाद 43) आणि अब्दुल समद (नाबाद 30) यांनी 55 धावांची अभेद्य भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱया उपांत्य सामन्यात 802 धावांनी आघाडीवर असलेला कर्नाटक संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी पहिल्या डावात 736 धावांचा डोंगर रचल्यानंतर उत्तराखंडला 233 धावांत गुंडाळले आणि फॉलोऑन न देता दुसऱया डावात चौथ्या दिवसअखेर 6 बाद 299 अशी मजल मारली.
या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला वेगवान गोलंदाज आकिब नबी. त्याने सामन्यात एकूण नऊ विकेट (पहिल्या डावात पाच, दुसऱया डावात चार) घेत बंगालच्या फलंदाजीचा कणा मोडला. दुसऱया डावात बंगाल अवघ्या 99 धावांत गारद झाला आणि तेथेच सामना जम्मू-कश्मीरच्या बाजूने झुकला.
1959-60 मध्ये प्रथम रणजी स्पर्धेत प्रवेश केलेल्या या संघाला अनेक दशपं सातत्याचा अभाव भेडसावत होता. 334 सामन्यांत केवळ 45 विजय-अशी त्यांची कहाणी. 1982-83 मध्ये पहिला विजय, 2015-16 मध्ये परवेज रसूलच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर मुंबईवर ऐतिहासिक मात, अशाच मोजक्या आठवणी जम्मू-काश्मिर संघाच्या होत्या. मात्र यंदाच्या हंगामात कर्णधार पारस डोगरा यांच्या नेतृत्वाखाली संघाने आत्मविश्वासाचे रूपांतर निकालात केले.
Comments are closed.