WC28: टी20 वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशची वापसी, सुपर-8 मधून बाहेर झाला असला तरी ऑस्ट्रेलिया वाचला

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चे सुपर-८चे संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत २० संघ खेळले असून त्यातील १२ संघांचा प्रवास संपला आहे. सुपर-८चे सामने २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत, ज्यामधून ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. स्पर्धा सुरुच असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने मोठी घोषणा जाहीर केली आहे.
पुरूष संघांचा पुढील टी२० विश्वचषक म्हणजेच २०२८ची आवृत्ती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी १२ संघ ठरले असून उर्वरित ८ संघांचा निर्णय क्वालिफायर राउंडमध्ये होईल. बुधवारी (१८ फेब्रुवारी) पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करताच दहाव्या आवृत्तीच्या सुपर-८चे संघ पूर्ण झाले. सुपर-८च्या पहिल्या गटात झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत आहे. दुसऱ्या गटात न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे २०२८च्या स्पर्धेचे यजमानपद असल्याने ते थेट पात्र ठरले आहेत. तसेच २०२६च्या विश्वचषकाच्या सुपर-८मध्ये पोहोचलेले संघही पात्र ठरले आहेत. यामुळे एकूण ९ संघ पात्र ठरले असून बाकी तीन संघ या टी२० विश्वचषकानंतर (९ मार्च) आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनंतर ठरतील. तसे या क्रमवारीत फारसा बदल दिसणार नाही, कारण ९ मार्चच्या आधी कोणताच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार नाही.
टी२० २०२८च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या उर्वरित तीन जागांसाठी बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड शर्यतीत असून ते अधिक पुढे आहेत. यामुळे २०२६मध्ये न खेळलेला बांग्लादेश २०२८च्या टी२० विश्वचषकात खेळेल. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.
भारतात खेळण्यास नकार दिल्याने बांग्लादेशने २०२६मधून माघार घेतली होती. त्यांची जागी नंतर स्कॉटलंडने घेतली, मात्र आता बांग्लादेश २०२८च्या आवृत्तीत खेळणार असल्याने स्कॉटलंडला क्वालिफायरचे सामने खेळावे लागणार आहेत.
Comments are closed.