शुभमंगल… घरफोड्यांपासून सावधान! डोंबिवलीत ४० तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला
सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. त्यामुळे शुभमंगल करायला जात असाल तर सावधान.. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरटे कधीही डल्ला मारू शकतात. अशीच एक घटना डोंबिवलीत घडली आहे. बंद घर फोडून चोरट्यांनी ५० हजारांची रोख रक्कम आणि तब्बल ४० तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील आर.पी. रेसिडेन्सी येथे राहणारे आशिष यादव हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी उत्तर प्रदेश येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. घर सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी घराची चावी सोनारपाडा येथे राहणारी बहीण मायादेवी यांच्याकडे दिली होती. ९ फेब्रुवारी रोजी घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करून बंद केले. १५ फेब्रुवारीला वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने बहीण मायादेवी व त्यांचे पती त्यांच्या घरात गेले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. आतील रूममध्ये प्रवेश केला असता दोन्ही बेडरूममधील कपाट उघडे होते. चोरट्याने लॉकर तोडून ५० हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या सहा बांगड्या, चार चेन, दोन कानातले, बारा अंगठ्या, एक हार असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.
दागिने लॉकरमध्ये ठेवा, सीसीटीव्ही लावा
सध्या सुट्टी व लग्नसराईच्या काळात गावी जाणाऱ्या कुटुंबांच्या घरांवर चोरट्यांचा डोळा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुट्टीवर जाताना दागिने, मौल्यवान वस्तू, रोकड बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा, घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगा. सोसायटीत परिसरात अनोळखी व्यक्ती, फेरीवाले यांना प्रवेश देऊ नका. आपल्या घराच्या दरवाजावर किंवा सोसायटीच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी व इमारतीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लावा असे आवाहन कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.
डोक्यात दगड घालून कामगाराची हत्या
पनवेल : डोक्यात दगड घालून कामगाराची हत्या केल्याची घटना गांधी हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलाखाली घडली आहे. विजय असे मृत कामगाराचे नाव आहे. विजय हा कॅटरिंगची कामे करायचा. सोमवारी रात्री अज्ञाताने डोक्यात दगड घालून विजयची हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
Comments are closed.