सवलतींचा पाऊस तरीही टीएमटी जोमात; आर्थिक घसरणीला ‘ब्रेक’, दैनंदिन उत्पन्नात सात लाखांची वाढ
महापालिकेतर्फे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष मोहीम राबवत विविध सवलती दिल्या आहेत. मात्र सवलतींचा पाऊस पाडला असला तरी टीएमटी जोमात धावत असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नात सात लाखांची वाढ झाली आहे. प्रतिदिन २३ लाखांवर गेलेले उत्पन्न आता ३० लाखांवर येऊन पोहोचले आहे. या आर्थिक घसरणीला ब्रेक लागल्याने परिवहन विभागाला दिलासा मिळाला आहे.
महापालिकेकडून १५ मार्च २०२४ पासून परिवहन प्रवाशांसाठी विशेष सवलती लागू केल्या. त्यात महिलांसाठी ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा योजना सुरू करण्यात आली. मात्र या सवलतींमुळे टीएमटीच्या आर्थिक गणितावर ताण आला आणि या बसेस ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवण्याची वेळ परिवहन विभागावर आली. त्यामुळे परिवहन विभागाला महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. यावर तोडगा म्हणून परिवहन विभागाने टीएमटी मार्गांची पुनर्रचना केली. कमी प्रवासी असलेल्या मार्गांवरील फेऱ्या रद्द करून त्या बसेस गर्दीच्या मार्गांवर वळवल्या. विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. तसेच ऑनलाइन तिकीट प्रणालीलाही प्रोत्साहन दिले. या सर्व उपाययोजनांमुळे परिवहनच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ झाली.
टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बसगाड्या असून त्यापैकी ३८० बसेस दररोज रस्त्यावर धावत आहेत. जवळपास ९८ मार्गावर ५ हजार ९६० फेऱ्या होत असून दररोज २ लाख ४५ हजार प्रवासी या बस सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे मार्गांचे वैज्ञानिक नियोजन तिकीट तपासणी मोहीम आणि डिजिटल व्यवहार वाढल्याने उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.
भालचंद्र बेहेरे, टीएमटी व्यवस्थापक
Comments are closed.