T20 WC26: नेदरलॅंड्सविरुद्ध रिंकूचा एक षटकार अन् कॅप्टन सूर्याचा रेकॉर्ड उधवस्त! वाचा सविस्तर

भारतीय संघाने बुधवारी (१८ फेब्रुवारी) त्यांचा आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा शेवटचा सामना खेळला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नेदरलॅंड्सला १९४ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात नेदरलॅंड्सने २० षटकात ७ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या होत्या. यामध्ये भारताने लोगन वॅन बीकने टाकलेल्या २०व्या षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंगने षटकार मारल्याने भारताने १३ धावा वसूल केल्या.
लोगनच्या त्या षटरकाच्या पहिल्या चेंडूवर शिवमने षटकार मारला आणि दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे तिसरा चेंडू खेळण्यास रिंकू फलंदाजीला आला असता त्याने एकही धाव केली नाही. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला.
रिंकू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे सूर्यकुमार मागे पडला असून तो तिसऱ्या स्थानी आला आहे. रिंकूने २०व्या षटकात आतापर्यंत ५० चेंडू खेळले असून १४ षटकार मारले आहेत. सूर्यकुमारने ३४ चेंडू खेळताना १३ षटकार मारले आहेत. या यादीत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने २०व्या षटकात १०२ चेंडू खेळले असून १६ षटकार मारले आहेत. हार्दिकने नेदरलॅंड्सविरुद्ध २१ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. यामध्ये ३ षटकारांचा समावेश आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये शिवमने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकार मारत ६६ धावा केल्या होत्या. त्याने गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली. त्याने ३ षटकात ३५ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. नेदरलॅंड्सकडून सर्वाधिक धावा बास दी लीडेने केल्या होत्या. त्याने २३ चेंडूत ३३ धावा केल्या होत्या. गोलंदाजीत लोगनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने ४ षटकात ५६ धावा दिल्या.
आंतरराष्ट्रीय टी२०च्या २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू-
१६ – हार्दिक पांड्या (१०२)
१४ – रिंकू सिंग (५० चेंडू)
१३ – सूर्यकुमार यादव (३४ चेंडू)
१२ – एमएस धोनी (१३२ चेंडू)
९- दिनेश कार्तिक (४९ चेंडू)
८- विराट कोहली (५८ चेंडू)
७ – अक्षर पटेल (७१ चेंडू)
Comments are closed.