कॅप्टन सूर्यकुमार यादवने भाकरी फिरवली; सुपर-8 फेरीपूर्वी घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी२० विश्वचषकातील गट अ सामन्यात नेदरलँड्स संघावर १७ धावांनी विजय मिळवत सलग चौथा विजय मिळवला. या सामन्याचा नायक अष्टपैलू शिवम दुबे ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आले.

प्रथम फलंदाजी करताना भारताची धावसंख्या ११० वर चार फलंदाज बाद अशी बिकट स्थिती झाली होती. त्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादव याने महत्त्वाचा निर्णय घेत हार्दिक पांड्या ऐवजी शिवम दुबेला फलंदाजीसाठी पाठवले. हा निर्णय अत्यंत यशस्वी ठरला. दुबेने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३१ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांच्या साहाय्याने ६६ धावांची दमदार खेळी उभारली. त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूंमध्ये ७६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या.

१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र भारताच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. वरुण चक्रवर्ती याने १४ धावांत ३ बळी घेतले, तर शिवम दुबेने मध्यमगती गोलंदाजी करत ३५ धावांत २ फलंदाज बाद केले. नेदरलँड्सचा डाव ७ गडी गमावून १७६ धावांवर आटोपला.

या विजयामुळे भारताने चार सामन्यांत आठ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले. नेदरलँड्सला चार सामन्यांत एक विजयासह दोन गुणांवर समाधान मानावे लागले. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवम दुबे याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा पुढील सामना सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहे. जो 22 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

Comments are closed.