राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी, धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधी: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या राज सिंह अमेराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या धमकीची राजस्थानमधील कोटा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. कोटा शहराच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु आहे. कायदा सर्वोच्च आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे,

आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही – करणी सेना

व्हिडिओमध्ये राज सिंह अमेरा यांनी स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी म्हणून ओळखले. दरम्यान, करणी सेनेने म्हटले आहे की त्यांचा याशी कोणताही संबंध नाही. ज्या अकाउंटवरून धमकी देण्यात आली होती ते अकाउंट निष्क्रिय करण्यात आले आहे. अमेरा हा कोटाचा रहिवासी आहे. त्याने ही धमकी इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघड धमक्या दिल्या जात आहेत. ही तीच विषारी आरएसएस मानसिकता आहे ज्याने एकेकाळी नथुराम गोडसेला जन्म दिला होता. हे भाजप-आरएसएसच्या उघड वैचारिक अतिरेकीपणाचे एक मॉडेल आहे, जिथे मतभेद आणि विरोधकांना राष्ट्रविरोधी असे लेबल लावून प्रथम वातावरण तयार केले जाते आणि शेवटी हिंसाचारासाठी जागा तयार केली जाते.

हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर चालणारा

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांदी हे संवैधानिक पदावर आहेत. ते लाखो भारतीयांच्या हक्कांचा आणि न्यायाचा आवाज असल्याचे गोविंद सिंह म्हणाले. परंतु ज्या अतिरेकी संघटनांनी त्यांना हत्येची धमकी दिली आणि कट रचला ते नेते आणि कार्यकर्ते मोकाट फिरत आहेत हे आश्चर्यकारक असल्याचा आरोप गोविंद सिंह यांनी केला आहे. अशा लोकांवर कारवाई कधी होणार? भाजप-आरएसएसने कितीही विष पसरवले तरी हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर जाईल असे गोविंद सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi : काय करायचं असेल ते करा, शेतकऱ्यांसोबत उभा राहणार, एक इंच मागं हटणार नाही : राहुल गांधी

आणखी वाचा

Comments are closed.