अमेरिकेची इराणवर हल्ल्याची तयारी; F-22 आणि F-35 फायटर जेट्स तैनात, इराणकडून NOTAM जारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचला असून, येत्या काही दिवसांत अमेरिका थेट तेहरानवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची तयारी सुरू केली असून, मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेने आपल्या सर्वात घातक F-22 आणि F-35 फायटर जेट्स तैनात करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची कुणकुण लागताच इराणने संपूर्ण देशात NOTAM (Notice to Air Missions) लागू केले आहे. यामुळे संपूर्ण इराण आता नो-फ्लाय झोन झाला आहे. अधिकृतपणे इराणने हे रॉकेट चाचणीसाठी केल्याचे म्हटले असले तरी, हा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून बचावाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

इराणमध्ये वाढत्या महागाईमुळे आणि अयातुल्ला अली खामेनेई यांच्या सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांमुळे परिस्थिती बिघडली आहे. अमेरिकेने या आंदोलनांना पाठिंबा दर्शवत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी लष्करी कारवाईची धमकी दिली होती. एक्सिओसच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेची ही कारवाई दीर्घकाळ चालू शकते. हा केवळ सर्जिकल स्ट्राईक नसेल, तर ते युद्धासारखे असू शकते, जे अनेक आठवडे चालेल.

दरम्यान, अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपल्या तळांवर विमानांचा ताफा वाढवला आहे. यामध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजीने सज्ज असलेल्या F-22 आणि F-35 विमानांचा समावेश आहे, जी कोणत्याही रडारला चकवा देऊन हल्ला करण्यास सक्षम आहेत. या आठवड्याच्या अखेरीस अमेरिका मोठा हल्ला करू शकते, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

Comments are closed.