शासनजमा झालेल्या ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स गायब; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुळ कायद्याचा भंग केल्याने शासनजमा झालेल्या ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि बहुचर्चीत बिल्डर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमीन ही कुळ कायद्याचा भंग करून एका बडय़ा बिल्डरच्या घशात घालण्यात आली होती. याच जागेवर प्रशासकीय संकुलाचेही आरक्षण आहे, असे असताना ही जागा संबंधित बिल्डरच्या ताब्यात होती. यासंदर्भातील संबंधित व्यवहार न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. तब्बल पंचवीस वर्षांनंतर कुळ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही जमीन जानेवारी 2026 मध्ये शासनजमा करण्यात आली. हजारो कोटींच्या या जमिनीच्या फाईल्स व अन्य कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात आले होते. संबंधित बिल्डर व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या हितसंबंधांमुळे कुठलीही कार्यवाही होत नव्हती. सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्निल कृष्णा आहिरे यांनी बुधवारी, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली. सर्वे नंबर 750, 751, 755 या मिळकतीच्या फाईल्स सन 2003 पासून चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्याकडे देण्यात आला आहे. या फाईल्स चोरीमागे संबंधित बिल्डर, अधिकारी, कर्मचारी यांचा संबंध असल्याचा पोलीस यंत्रणेला संशय असून, त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.

Comments are closed.