बुलेट ट्रेन फक्त गुजरात्यांसाठीच! आता मराठी माणसांनीही गुजरातला जाऊन व्यापार करावा, गणेश नाईक यांचे परखड विधान
महाराष्ट्र बुलेट ट्रेनने गुजरातला जोडला जाणार आहे. बुलेट ट्रेन फक्त गुजरात्यांसाठीच आहे असे म्हणतात, पण या बुलेट ट्रेनमधून फक्त गुजराती माणसांनीच यावे, असा काही सिद्धांत आहे का, असा परखड सवाल करतानाच बुलेट ट्रेनने मराठी माणसांनीही गुजरातला जावे आणि तिथे व्यवसाय करावा, असे आवाहन वनमंत्री आणि पालघर जिह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज केले.
पालघर जिह्यातील शिरगाव या प्रसिद्ध पर्यटनस्थळी ग्लोबल कोकण महोत्सव 2026 याअंतर्गत बीच फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश नाईक यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले त्यावेळी नाईक बोलत होते.
बुलेट ट्रेनमुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. बुलेट ट्रेनमधून फक्त गुजराती माणसांनीच मुंबई आणि महाराष्ट्रात यावे असे नाही. याच टेनमधून मराठी माणसानेही गुजरातमध्ये जाऊन तिथे उद्योग आणि व्यवसाय करावा, असे नाईक म्हणाले. मराठी माणसांनीही व्यवसायासाठी गुजरातमध्ये गेले पाहिजे. व्यवसायासाठी गुजरातमध्ये जाणाऱ्या मराठी माणसांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे गणेश नाईक पुढे म्हणाले.
पालघर जिह्यात वाढवण बंदर, मुरबे बंदर, ऑफशोर विमानतळ यासह बुलेट ट्रेनसारखे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. बंदराच्या होत असलेल्या विकासामुळे मुंबईतून येणाऱ्या प्रवासी बोटी थेट या ठिकाणी येणार आहेत. या बोटी फक्त पालघरपर्यंतच नाही तर भविष्यात गुजरातपर्यंतही जाणार आहेत, असे नाईक यांनी सांगितले.
मराठी माणूस कुठेच कमी नाही. मराठी माणसांनाही गुजरातमध्ये जाऊ द्या. तिथे व्यवसाय उद्योग करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले करा!
Comments are closed.