अफगाणिस्तानचा शेवट गोड, कॅनडाविरुद्ध 82 धावांनी दणदणीत विजय

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ मधील आपली मोहिम प्रभावीपणे संपवली. संघाने आपल्या ३९ व्या सामन्यात कॅनडाला ८२ धावांनी पराभूत करत अंतिम विजय मिळवला. कॅनडाने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण अफगाणिस्तानच्या आक्रमक फलंदाजीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अफगाणिस्तानने २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या, ज्या त्यांच्या टी २० वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरल्या.

या सामन्यात इब्राहीम झाद्रान याने नाबाद ९५ धावा करत अफगाणिस्तानसाठी विक्रम रचला. त्याच्या ५ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या. तसेच सेदीकुल्लाह अटल याने ४४ आणि रहमानुल्लाह गुरुबाज याने ३० धावांचे योगदान दिले. कॅनडाकडून हर्ष ठाकेर याने २४ चेंडूत ३०, साद बीन झफर याने २८ तर युवराज सामरा १७ धावा केल्या.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीने कॅनडाच्या सर्व प्रयत्नांवर विराम लावला. अनुभवी ऑलराऊंडर मोहम्मद नबी याने ४ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. राशीद खान याने २ तर मुजीब उर रहमान आणि अझमतुल्लाह ओमरझई यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत सामन्यावर आपला ठसा उमटवला. कॅनडासाठी जसकरण सिंग याने ३ विकेट्स घेत काही प्रमाणात प्रतिसाद दिला.

हा विजय अफगाणिस्तानसाठी सलग दुसरा ठरला. संघाने आपल्या मोहिमेचा शेवट उत्कृष्ट पद्धतीने केला आणि कॅनडाला या स्पर्धेत अजिबात विजय मिळवता आला नाही. सामन्यानंतर इब्राहीम झाद्रान याला त्याच्या ९५ धावांच्या उत्कृष्ट खेळासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

Comments are closed.