अनेक विमानतळांवर चेक-इन व्यत्यय
दिल्लीसह देशभरातील अनेक ठिकाणी गोंधळ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशात विविध विमानतळांवरील चेक-इन सिस्टीममध्ये गुरुवारी सकाळी अचानक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. नेव्हिटायर सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली. सकाळी 6:45 ते 7:28 पर्यंत जवळपास 43 मिनिटे या यंत्रणेमध्ये व्यत्यय आल्यानंतर इंडिगो, अकासा एअर, स्पाइसजेट आणि एअर इंडिया एक्स्प्रेस सारख्या प्रमुख विमान कंपन्यांच्या चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाला.
या असुविधेमुळे प्रवाशांना रांगांमध्ये ताटकळत उभे रहावे लागले. संगणकीय यंत्रणा डाउन असल्याने विमानतळ कर्मचाऱ्यांना मॅन्युअल चेक-इनचा अवलंब करावा लागला. ही सुविधा फारच संथगतीने सुरू राहिल्यामुळे काउंटरवर गोंधळ निर्माण झाला. याचदरम्यान अनेक प्रवाशांची उ•ाणे चुकली आणि विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. सकाळी 8:25 च्या सुमारास सर्व्हर पूर्णपणे पूर्ववत केल्यानंतर वाहतूक सामान्य झाली. विमानतळावरील परिस्थिती कालांतराने सामान्य झाली असली तरी या घटनेमुळे एअरलाइन सिस्टमच्या विश्वासार्हता आणि तांत्रिक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Comments are closed.