बॉम्बच्या धमकीमुळे पंजाब सचिवालयात दहशत
पोलीस बंदोबस्तात वाढ, सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था/चंदीगड
चंदीगडमधील पंजाब सचिवालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर सुरक्षा तात्काळ वाढवण्यात आली आहे. सचिवालय प्रशासनाला इमारत उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल गुरुवारी सकाळी मिळाला. खबरदारी म्हणून संपूर्ण संकुलात सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून सचिवालयाच्या प्रवेश आणि निर्गमन केंद्रांवर कडक तपासणी सुरू करण्यात आली होती. तपासणीत कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब सापडला नाही. आता सुरक्षा यंत्रणा ई-मेलच्या स्रोताची चौकशी करत असून हा एक खोडसाळपणा होता की गंभीर कट होता याचा तपास केला जात आहे. सचिवालयाला ईमेलद्वारे धमकी पाठवण्यात आली. सचिवालय ही एक संवेदनशील सरकारी इमारत असल्याने प्रशासनाने कोणत्याही त्रुटींकडे दुर्लक्ष केले नाही. सायबर सेलच्या मदतीने या ईमेलचा स्रोत आणि पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.