खेळण्याच्या वादातून कोयत्याने हल्ला
खासगी ग्राऊंडमध्ये खेळणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. ग्राऊंडमध्ये खेळू नका असे बजावूनही मुले तेथे खेळत असल्याने माथेफिरू मालकाने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. अनुराग गुप्ता असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्या मानेला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
श्रीरामनगर लोणेरे परिसरात राहणारा अनुराग गुप्ता हा मित्रांसोबत शेताच्या शेजारी असलेल्या ग्राऊंडमध्ये खेळण्यासाठी गेला होता. हे ग्राऊंड बाबुराम टेंबे यांच्या मालकीचे आहे. टेंबे याने त्यांना ग्राऊंडवर खेळण्यासाठी नकार दिला. मात्र तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद झाला. यावेळी संतापलेल्या टेंबेला राग अनावर झाल्याने त्याने कोयत्याने हल्ला करून अनुरागला जखमी केले आहे. या हल्ल्यात अनुराग गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलीस तपास करत आहेत.
Comments are closed.