मोहम्मद नबींचा ऐतिहासिक पराक्रम; 41व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत नवा विक्रम

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात नबीने आपल्या चार षटकांच्या कोट्यात अवघ्या ७ धावा देत ४ बळी टिपले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कॅनडाचा डाव २० षटकांत ८ बाद ११८ धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तानने ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
४१ वर्षे ४९ दिवसांच्या वयात ही कामगिरी करत मोहम्मद नबी आयसीसी वनडे आणि टी-२० विश्वचषकांच्या इतिहासात ४ बळी घेणारे सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी मानली जात आहे. अनुभवी खेळाडू म्हणून संघाला आवश्यक त्या वेळी जबाबदारी उचलण्याची त्यांची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली.
या कामगिरीसह नबी अफगाणिस्तानकडून टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने आपला कर्णधार राशिद खान यालाही मागे टाकले. राशिदने २०२१ च्या टी-२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध ९ धावांत ४ बळी घेतले होते. या यादीत नबींपुढे फजलहक फारुकी आणि मुजीब-उर-रहमान यांची नावे असून, या दोघांनी टी-२० विश्वचषकात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद २०० धावांचा भक्कम डोंगर उभा केला. सलामीवीर इब्राहिमने ५६ चेंडूत ९५ धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाला अफगाण गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही.
इब्राहिम झद्रानला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अनुभवी मोहम्मद नबी याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात आपली ताकद दाखवली.
Comments are closed.