विश्वविजेत्या अंध क्रिकेट संघासाठी जय शाह आणि बीसीसीआयचं मोठं पाऊल; आता खेळाडूंच्या प्रगतीला मिळणार जागतिक ओळख

भारतीय अंध क्रिकेट संघटनेने (CABI) महिला संघाला पहिला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या ‘बीसीसीआय’ने मदतीचा हात दिला आहे. बीसीसीआयच्या या पाठबळामुळे भारतातील आणि जगातील अंध क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास ‘CABI’ ने व्यक्त केला असून बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
गेल्या दशकात भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने 2012 पासून अनेक विश्वचषक जिंकले आहेत, तर महिला संघानेही अलीकडेच विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. आता बीसीसीआय आणि सीएबीआई यांच्यातील भागीदारीमुळे आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन आणि परदेशातील मालिकांमध्ये सहभागी होणे अधिक सोपे होणार आहे.
भारतीय अंध क्रिकेटपटूंचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी बीसीसीआयने या गोष्टींची जबाबदारी घेतली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी वर्षाला दोन परदेशी स्पर्धांचा प्रवास आणि निवासाचा खर्च बीसीसीआय करेल. भारतात होणाऱ्या दोन देशांतील मालिकांदरम्यान भारतीय आणि पाहुण्या संघाच्या राहण्याची सोय बीसीसीआय करेल.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बीसीसीआयच्या नियंत्रणाखाली असलेली मोठी स्टेडियम्स आणि मैदाने अंध क्रिकेटपटूंना उपलब्ध करून दिली जातील. आयसीसी (ICC) अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेनंतर हे सहकार्य शक्य झाले आहे. जय शाह यांनी नेहमीच क्रिकेटचा विकास सर्वसमावेशक असावा, यावर भर दिला आहे. भारत 2026 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावा करत आहे, अशा वेळी बीसीसीआय आणि सीएबीआई यांची ही भागीदारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर (IOC) एक उत्तम उदाहरण म्हणून सादर होईल. ‘समर्थनम’ ग्रुपचे संस्थापक डॉ. महंतेश जी. किवदासनवर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा अंध खेळाडूंसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
Comments are closed.