झॅम्पाच्या फिरकीची जादू! ओमानवर मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा टी-20 वर्ल्ड कपमधून विजयी निरोप

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मधील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा 9 गडी राखून पराभव केला. पल्लेकेले येथे झालेल्या या सामन्यात ओमानने दिलेले 105 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 9.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. जरी या विजयाने ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवास संपला असला आणि संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला, तरी त्यांनी शेवट विजयाने केला.
या सामन्याचा खरा हिरो ठरला तो फिरकीपटू ॲडम झॅम्पा (Addam Zampa). त्याने अवघ्या 3.2 षटकांत 21 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी घेतले आणि ओमानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्यासोबतच ग्लेन मॅक्सवेल आणि जेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मार्कस स्टोइनिस आणि नॅथन एलिस यांना 1-1 विकेट मिळाली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ओमानचा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकला नाही आणि 16.2 षटकांत 104 धावांवर सर्वबाद झाला. ओमानची सुरुवात अत्यंत खराब झाली; त्यांचा सलामीवीर आमिर कलीम पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. वसीम अलीने सर्वाधिक 32 धावा केल्या, तर इतर 7 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
Comments are closed.